मुंबई : ‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटातील ‘पिंगा’ आणि ‘मल्हारी’ या गाण्यांमुळे या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यात यावी, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली.
संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘बाजीराव मस्तानी’ हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. मात्र, यामध्ये ‘पिंगा’ या गाण्यामध्ये काशीबाई आणि मस्तानी यांचे एकत्र नृत्य तर ‘मल्हारी’ गाण्यामध्ये खुद्द बाजीराव पेशवे यांनी नृत्य केल्याचे दृश्य आहे.
हे इतिहासाचे विकृतीकरण असून लोकांच्या भावना दुखावणारे आहे, असा दावा करत पुण्यातील नागरिक हेमंत पाटील यांनी न्यायालयात चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालावी, यासाठी याचिका दाखल केली होती.
या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली असून मुंबई उच्च न्यायालयाने ती फेटाळून लावली आहे. चित्रपटाला विरोध होत असेल, अंदोलन होत असेल तर त्याची दखल राज्य सरकारने घ्यावी, असे न्यायालयाने सांगितले आहे.