पुणे : बाजीराव पेशवेंच्या जीवनावर आधारीत ‘बाजीराव मस्तानी’ या चित्रपटाला विरोध करत पुण्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये या चित्रपटाचे शो रद्द करण्यात आले आहेत. हा चित्रपट शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.
‘बाजीराव-मस्तानी’ या चित्रपटविरोधात पुणे भाजपाने आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे या चित्रपटाचे शो रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुण्यातील सिटी प्राईड या चित्रपटगृहामध्ये ‘बाजीराव-मस्तानी’चे तीन शो होणार होते. त्यात पहिला शो सकाळी आठ वाजता होता. पण हा शो रद्द करण्यात आला आहे. या चित्रपटगृहाच्या बाहेर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
या चित्रपटात बाजीराव यांची पत्नी काशीबाई आणि मस्तानी यांना ‘पिंगा’ या गाण्यावर तसेच खुद्द बाजीरावांना सैनिकांसोबत ‘मल्हारी’ या गाण्यावर नाचताना दाखवल्याने अनेकांच्या मनात संतापाची भावना आहे.
बाजीराव पेशवे यांच्या वंशजानी वादग्रस्त गाणे वगळण्याची मागणी केली होती. चुकीचे गाणे वगळण्यात न आल्याने ‘बाजीराव-मस्तानी’ सिनेमाचे शो बंद पाडण्याचा इशारा त्यांनी दिला होता.