** आ.संदीप नाईक यांची औचित्याच्या मुद्याद्वारे विधानसभेत मागणी**
नागपूर : सिडकोने नवी मुंबई वसविण्यासाठी ग्रामस्थ आणि शेतकर्यांच्या हजारो एकर जमिनी कवडीमोल भावाने संपादीत केल्या परंतु गावठाणांचा विस्तार केला नाही. परिणामी प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी उदरनिर्वाहासाठी निवासी आणि वाणिज्य बांधकामे केली.गावठाण हद्द निश्चीत न करता सिडकोने या बांधकामांवर आता सरसकट कारवाई सुरु केली आहे. ही कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणी आ.संदीप नाईक यांनी अधिवेशनादरम्यान राज्य सरकारकडे केली आहे.
गावठाण विस्तार योजना व गरजेपोटी घरे याबाबत ग्रामस्थांवर होत असलेल्या अन्यायाबाबत आक्रमक भूमिका घेत नवी मुंबईतील ग्रामस्थांच्या समस्यांकडे आमदार संदीप नाईकांनी अधिवेशनाच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे. ग्रामस्थांच्या समस्यांवर बोलघेवडेपणा करणारे अनेक चमकेश राजकीय मंडळी गेली अनेक वर्षे ग्रामस्थांची दिशाभूल करत असताना आमदार संदीप नाईकांनी औचित्याचा मुद्दा मांडत येथील ग्रामस्थांची सद्यस्थितीकडे महाराष्ट्राचे लक्ष वेधण्याचा प्रयास केला.
नवी मुंबईतील गावठाणांच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या हिताची सर्व समावेशक योजना जाहिर करावी, अशी आग्रही मागणी आ.संदीप नाईक यांनी आज विधानसभेमध्ये औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
गावठाणांच्या विकासासाठी युती शासनाने क्लस्टर योजना जाहिर केली असली तर या योजनेमध्ये अनेक त्रुटी आहेत. त्यामुळे या योजनेची अंतिम अधिसूचना प्रसिध्द करण्यापुर्वी या योजनेमध्ये ग्रामस्थांच्या सूचनांचा समावेश करावा. आणि त्यांच्या हिताची सर्व समावेशक योजना आणावी, अशी मागणी आ.नाईक यांनी केली.
सध्या सुरु असलेल्या विधीमंडळाच्या अधिवेशनामध्ये नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्त, शेतकरी आणि गरजेपोटी केलेल्या बांधकामामधून राहणार्या नागरिकांचे प्रश्न आक्रमकपणे आ.संदीप नाईक यांनी मांडले असून त्यावर सरकारला सकारात्क कार्यवाही करण्यास भाग पाडले आहे.