नवी मुंबई : स्वच्छ महाराष्ट्र अभियानाच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विभागाविभागात पोहचून स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून आज से. ८, सी.बी.डी. बेलापूर येथील नमुंमपा शाळा क्र. ४ च्या २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयक रॅली काढून मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली.
यामध्ये परिवहन समितीचे सभापती साबु डॅनिअल, पाणी पुरवठा व मलनि:स्सारण समितीचे सभापती अशोक गुरखे, स्थानिक नगरसेविका सौ. सुरेखा नरबागे, अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, स्वच्छ महाराष्ट्र अभियान उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, विभाग अधिकारी धर्मेंद्र गायकवाड, शिक्षण विभागाचे कार्यक्रम अधिकारी योगेश हन्नुरकर यांनी स्थानिक नागरिक व शिक्षक, विद्यार्थ्यांसह उत्स्फुर्त सहभाग घेतला.
‘उघड्यावर शौचास बसू नका, रोगराईला थारा देऊ नका, स्वच्छतागृहाचा वापर करा, आरोग्याची कास धरा’ अशा घोषणा देत या रॅलीने से. ८, सी.बी.डी. बेलापूर येथील झोपडपट्टी परिसर, आर्टिस्ट व्हिलेज आणि इतर वसाहतींमध्ये स्वच्छतेचा जागर केला.
अशाचप्रकारचा स्वच्छताविषयक जनजागृतीपर कार्यक्रम से. २७ नेरुळ येथील प्रेझेन्टेशन स्कुलमध्ये आयोजित करण्यात आला होता. याठिकाणी उपस्थित पालकांना स्वच्छता ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे असे स्पष्ट करीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांनी नागरिक पातळीवरच ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवणेबाबत माहिती देऊन आवाहन केले. स्वच्छ नवी मुंबई मिशनच्या ब्रॅण्ड अँबेसेडर अर्जुन पुरस्कार विजेत्या आंतरराष्ट्रीय कबड्डीपट्टू श्रीम. अभिलाषा म्हात्रे यांनी दोन्ही कार्यक्रमांत उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. याप्रसंगी महापालिका अधिकार्यांसमवेत स्थानिक नगरसेविका सौ. सलुजा संदिप सुतार उपस्थित होत्या.