नवी दिल्ली : संपूर्ण देशाला हदरवून टाकणार्या निर्भया सामुहिक बलात्कार प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या सुटकेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. महिला आयोगाने आरोपीच्या सुटकेविरोधात दाखल केलेली याचिका दिल्ली सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली.
शिक्षेचा कालावधी पूर्ण झाल्यामुळे डांबून ठेवणे चुकीचे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.
अल्पवयीन गुन्हेगाराच्या सुटकेला विरोध करत दिल्ली महिला आयोगाने शनिवारी मध्यरात्री सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. महिला आयोगाच्या याचिकेवर सुनावणी घेण्याचे मान्य करत सरन्यायाधीशांनी ही कार्यवाही सुटीतील खंडपीठासमोर करण्याचे आदेश दिले होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महिला आयोगाने दाखल केलेली याचिका फेटाळली आहे. त्यामुळे आता या आरोपीची सुटका झाली असून सुरक्षेच्या कारणास्तव त्याला एका सामाजिक संस्थेच्या देखरेखी खाली सोपवण्यात आले आहे.