नवी दिल्ली : सोने खरेदीला जाताय तर थोडे थांबा. कारण अजून स्वस्त होणार आहे सोने. जागतिक बाजारातील मंदी आणि दागिन्यांच्या मागणीत घट राहिल्याने सोन्याच्या किंमतीत गेल्या आठवड्यात 470 रुपयांनी घट पाहायला मिळाली. सोन्याचे दर प्रति ग्रॅम 26 हजारांवरुन घसरुन 25 हजार 530 वर बंद झाले. तसेच बाजारातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर कपातमुळे डॉलर मजबूत झाला आणि बहुमुल्य धातूंच्या मागणीत घट झाली. याचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर झाला. मार्चनंतर मौल्यवान धातूंच्या किंमतीत प्रथमच इतकी घट झाली.
जागतिक बाजारात या आठवड्यात न्यूयॉर्क बाजारात सोन्याचे दर एक टक्क्यांनी घसरले. तसेच यादरम्यान सरकारने सोन्याच्या आयातीवरीलह शुल्क वाढवले. सोन्याचे आयात दर 347 डॉलर प्रति 10 ग्रॅम करण्यात आले. तर चांदीच्या आयात दरात कपात करुन ते 448 डॉलर प्रति किलो करण्यात आले.