कामगार नेते रविंद्र सावंत यांच्या प्रयत्नांना यश
नवी मुंबई : उद्याच्या महासभेत डॉ. रमेश निकम यांचा पदोन्नतीचा प्रस्ताव सादर करण्याचे आश्वासन खुद्द महापौर सुधाकर सोनवणे यांनी दिल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका मागासवर्गिय व इतर मागासवर्गिय अधिकारी-कर्मचारी महासंघाचे नियोजित आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती महासंघाचे मानद सचिव व कॉंग्रेस पक्षाचे रोजगार – स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी दिली.
गेल्या काही दिवसापासून रविंद्र सावंत यांनी महापालिका प्रशासनातील कंत्राटी व कायम कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी व त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासन दरबारी पाठपुरावा सुरू केल्याने पालिका प्रशासनाचे, प्रस्थापि राजकीय घटकांचे व अन्य कामगार संघटनांचे धाबे दणाणल्याचे महापालिका मुख्यालयात पहावयास मिळत आहे.
डॉ. रमेश निकम यांना पदोन्नतीबाबत महापालिका प्रशासनाकडून सातत्याने डावलले जात असल्यामुळे महासंघाकडून १८ डिसेंबरच्या महासभेत उग्र आंदोलने व निदर्शने करण्याचा कार्यक्रम ठरविण्यात आला होता. महापालिका प्रशासनाला तशी महासंघाच्यावतीने रविंद्र सावंत यांनी कल्पनाही दिली होती. डॉ. निकम यांच्यासह अन्य कर्मचारी-अधिकार्यांच्या अन्य समस्यांकडेही या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्याचा इशारा सावंत यांनी दिला होता. प्रशासनाने महासंघाचा आंदोलनाचा पावित्रा लक्षात घेवून तातडीने रविंद्र सावंत व त्यांच्या सहकार्यांना चर्चेसाठी बोलावून घेतले.
रविंद्र सावंत हे महासंघाच्या पदाधिकार्यांसह व कामगारांसमवेत चर्चेला गेले असता या चर्चेत महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, महापालिका मुख्यालय उपायुक्त जगन्नाथ सिन्नरकर सहभागी झाले. चर्चेत रविंद्र सावंत महापालिका आस्थापनेत काम करत असलेल्या कंत्राटी व कायम कामगारांच्या समस्येचा पाढा वाचला. कामगारांच्या समस्येचे गांभीर्य महापौर, उपमहापौरांसह सिन्नरकरांच्या निदर्शनास आणून दिले. डॉ. रमेश निकम यांच्यावर पदोन्नतीप्रकरणी प्रशासनाकडून सातत्याने अन्याय का होत आहे, याचा जाबही रविंद्र सावंत यांनी या चर्चेदरम्यान प्रशासनाला विचारला.
यावेळी महापौरांनी समस्या जाणून घेतल्यावर उद्याच्या महासभेत तातडीने डॉ. निकम यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव सादर करण्याचे व कामगारांच्या समस्येवर लवकरच साधकबाधक चर्चा करण्याचे आश्वासन दिले.
महापौरांच्या आश्वासामुळे उद्याचे नियोजित आंदोलन स्थगित करत असल्याची माहिती रविंद्र सावंत यांनी दिली. तथापि कामगारांच्या उर्वरित समस्यांवर प्रशासनाकडून सहकार्य न मिळाल्यास आगामी काळात आपण आंदोलन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा सावंत यांनी यावेळी दिला. डॉ. निकम पदोन्नतीप्रकरणी महासंघाच्या पावित्र्याला प्रशासनाचा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने कामगार वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.