नवी मुंबई : देशातील सर्वात स्वच्छ शहराचे तृतीय नामांकन उंचाविण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने व्यापक मोहिम हाती घेतली असून विविध विभागात स्वच्छता विषयक राबविण्यात येणार्या उपक्रमांना नागरिकांचा उत्साही सहभाग लाभत असल्याने स्वच्छतेचा संदेश स्वकृतीतून अमलात आणण्यासाठी नवी मुंबई सज्ज झालेली दिसत आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत पोस्टर्स, होर्डींग्ज यामाध्यमातून जनजागृती करण्यात येत असून वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्येही सादर करण्यात येत आहेत.
यामध्ये शहर स्वच्छतेसाठी महत्वपूर्ण योगदान देणार्या सफाई कामगार यांना नवी मुंबई स्वच्छ मिशन मागील भूमिका घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे व स्वच्छ महाराष्ट्र अभियान कक्षप्रमुख उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, इ.टी.सी. केंद्र संचालक डॉ. वर्षा भगत हे अधिकारी समजावून देत आहेत. नवी मुंबई शहराचा देशात तृतीय व राज्यात प्रथम क्रमांक येण्यात सफाई कामगारांचे असलेले महत्वपूर्ण योगदान त्यांना सांगत यापुढील काळात त्यांच्याकडून अधिक चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. याकरीता त्यांचे प्रबोधन व त्यांना मार्गदर्शन करण्यात येत असून प्रत्येक विभाग कार्यालय क्षेत्रात गटनिहाय होत असलेल्या स्वच्छतेचे स्पर्धात्मक निरीक्षण करुन पारितोषिके देण्यात येणार आहेत. विभागाअंतर्गत गटनिहाय दैनंदिन साफसफाई करताना आपापल्या गट क्षेत्रातील उघड्यावर शौचास बसण्याची ठिकाणे, रस्त्यांवर अनेक काळापासून बंद स्वरुपात असणारी वाहने यांची माहिती तेथील कामगारांनी विभाग कार्यालयामार्फत मुख्यालयापर्यंत पोहचवयाची आहे.
से. १७, वाशीतील बाबू गेनु मैदान, से. ३ ऐरोली येथे भारतरत्न राजीव गांधी उद्यान, छत्रपती शाहु महाराज विद्यालय आंबेडकर नगर रबाळे, सिताराम मास्तर उद्यान, सानपाडा अशा विविध ठिकाणी त्या-त्या विभाग कार्यक्षेत्रातील सफाई कामगार, त्यांचे कंत्राटदार, स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, माळी, शौचालय सफाई ठेकेदार व तेथील कर्मचारी तसेच विभाग अधिकारी व कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांच्याशी स्वच्छतेचे मानांकन उंचाविण्यासाठी संवाद साधण्यात आला. अशाचप्रकारे सर्वच विभागात दैनंदिन स्वच्छतेशी संबंधीत या सर्व घटकांची अधिक उत्तम स्वच्छतेसाठी मानसिकता तयार करण्यात येत आहे. हागणदारीमुक्त शहराप्रमाणेच दररोज घराघरातून संकलीत केला जाणारा कचरा नागरिकांच्या पातळीवरच ओला आणि सुका असा वेगवेगळा करण्यात यावा यादृष्टीने सतत स्वच्छता संदेश प्रसारीत करण्याची गरज असल्याचे या घटकांना सांगितले जात आहे.
त्याचबरोबरीने या सर्व उपक्रमांत मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सहभाग घेतला जात असून दिघा येथे संजिवनी विद्यालय व स्वामी विवेकानंद हायस्कुल येथील १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ईश्वरनगर दिघा परिसरात स्वच्छता रॅली काढून हागणदारीमुक्त शहराचा निर्धार व्यक्त केला व यादृष्टीने जनजागृती केली. महापौर सुधाकर सोनवणे यांनी प्रत्येक उपक्रमाच्या ठिकाणी स्वच्छतेची सामुहिक शपथ सर्वांना देत शहर स्वच्छतेसाठी एकत्रित प्रयत्नांचे आवाहन केले. यावेळी स्थानिक नगरसेवक जगदिश गवते, सौ. शुभांगी गवते, सौ. उज्वला झंजाड आणि इतर महापालिका अधिकारी उपस्थित होते.
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमानेही स्वच्छतेची कास धरत महापौर सुधाकर सोनवणे व परिवहन सभापती साबु डॅनिअल यांच्या उपस्थितीत वाशी बसडेपोपासून स्वच्छता मोहिमेची सुरुवात करीत तुर्भे आगार, वाशी, कोपरखैरणे, ऐरोलीसह सर्वच बसडेपोच्या आतील व बाहेरील परिसर स्वच्छ केला. या मोहिमेमध्ये कर्मविर भाऊराव पाटील महाविद्यालयाचे १५० हून अधिक विद्यार्थी उत्साहाने सक्रीय सहभागी झाले. अतिरिक्त आयुक्त सेवा डॉ. संजय पत्तीवार तसेच परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांच्यासह परिवहन उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी या स्वच्छता मोहिमेत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले. सर्वच ठिकाणी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण करण्यात आली. सर्वच डेपोंच्या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश प्रसारीत करणारे होर्डींग्ज लावण्यात आले आहेत. या उपक्रमाप्रसंगी विविध ठिकाणी नगरसेवक डॉ. जयाजी नाथ, संजु वाडे, मनोज हळदणकर, सौ. नंदा काटे, उप आयुक्त उमेश वाघ तसेच त्यात्या विभाग क्षेत्रातील विभाग अधिकारी गणेश आघाव, महेंद्र सप्रे, डॉ. अजय गडदे, किशोर खाचणे, भरत धांडे, महेंद्रसिंग ठोके, उत्तम खरात, धर्मेंद्र गायकवाड आणि इतर मान्यवर नागरिक उपस्थित होते.