नवी मुंबई : देशभरात नावाजल्या जाणार्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या आजवरच्या यशस्वी वाटचालीत लोकप्रतिनिधींप्रमाणेच अधिकारी, कर्मचारी यांचे महत्त्वाचे योगदान असून नागरिकांचाही सहयोग नेहमीच मिळत आलेला आहे. स्वच्छतेबाबत देशातील तिसरा क्रमांक उंचावण्यासाठी आपण सर्वांनी सामुहिक प्रयत्न करण्याची गरज असून हे मानांकन सर्वांच्या सहयोगाने निश्चित उंचावेल असा विश्वास नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त करीत उपस्थितांना तसेच समस्त नवी मुंबईकर नागरिकांना नववर्षाच्या व महापालिका वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या.
विष्णुदास भावे नाटयगृह येथे संपन्न झालेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या २४ व्या वर्धापनदिन समारंभात ते आपले मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे, सभागृह नेता जयवंत सुतार, माजी खासदार संजीव नाईक, विद्यार्थी युवक कल्याण समिती सभापती गिरीश म्हात्रे आणि इतर मान्यवर नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासह उपस्थितांनी स्वच्छतेची सामुहिक शपथ ग्रहण केली. यावर महापौरांनी आपण स्वच्छतेची शपथ ग्रहण करतो म्हणजे आपल्या देशाला स्वच्छतेचे कर्तव्य पार पाडण्याचे वचन देतो हे लक्षात घेऊन आपण स्वच्छतेच्या शपथेशी बांधील राहत आठवडयातील किमान दोन तास आपल्या कार्यस्थळाच्या स्वच्छतेसाठी दिले पाहिजेत असे सांगितले व प्रत्येक नागरिकाने स्वयंस्फुर्तीने आपले योगदान द्यावे असे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी प्रास्ताविकपर मनोगतात मागील वर्षभरातील उल्लेखनीय पुरस्कार, सन्मान, वैशिष्टयपूर्ण सुविधा कामे यांचा आढावा घेतला. मागील वर्षात केंद्र सरकारने जाहीर केलेल्या स्वच्छ शहरांच्या यादीत नवी मुंबई महानगरपालिकेस लाभलेले तृतीय मानांकन, स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत राज्यातील १० व देशांतील ९८ शहरांमध्ये झालेली निवड, एन.एम.एम.टी. उपक्रमाला दोन राष्ट्रीय अस्त्र्तू प्रोडक्टिव्हिटी पुरस्कार, घनकचरा व्यवस्थापन प्रणालीस राष्ट्रीय क्लीन अर्थ वॉर्ड, महापालिका मुख्यालय वास्तूस ग्रीन बिल्डींगचे गोल्ड मानांकन, अत्याधुनिक तंत्रप्रणालीचा वापर करून यशस्वीरित्या संपन्न झालेल्या महापालिका निवडणूक प्रणालीचे राज्य निवडणूक आयोगाकडून पथदर्शी म्हणून झालेली प्रशंसा, मलेरिया-डेंग्यू नियंत्रणासाठी महापालिका करीत असलेली कार्यवाही उत्तम असून या प्रणालीचा कृती आराखडा देशभरात राबविण्याबाबत राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या राष्ट्रीय सहसंचालकांकडून लाभलेली प्रशस्ती, भूतान देशाच्या तसेच देशभरातील महालेखाकारांच्या राष्ट्रीय अभ्यास समुहाने महापालिका प्रकल्पांची केलेली प्रशंसा अशा वर्षभरातील विविध उल्लेखनीय बाबींचा विशेष उल्लेख करीत सर्वांच्या एकत्रीत सहयोगाने यापुढील काळातही ही प्रगतीशील वाटचाल अशीच सुरु राहील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी महापौर सुधाकर सोनवणे यांच्या शुभहस्ते दैनंदिनी २०१६ तसेच प्रतिमा – नवी मुंबईची छायाचित्रण स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांच्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या दिनदर्शिका २०१६ चे प्रकाशन संपन्न झाले. सकाळी १० वाजल्यापासून महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी सादर केलेल्या गायन, नृत्य, व नाटयाविष्कारांना उपस्थितांनी कौतुकाची दाद दिली. वर्धापनदिनाच्या या आनंद सोहळयात लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीयदेखील उत्साहाने सहभागी झाले होते.