मुंबई : मुंबईत घर घेऊ इच्छीणार्यांसाठी अखेर खुशखबर आहे. मध्यम गटातील निवासी प्रकल्पांचा दर २०१५ मध्ये ४ ते २० टक्क्यांनी खाली आला आहे.
मुंबईप्रमाणेच राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि बंगळुरुतही या गटातील घरांचे दर खाली आले आहेत. सर्वाधिक घट २० टक्के गोरेगावातील असून तेथे सरासरी किमान मूळ किंमत १०,५०० रुपये प्रति चौरस फुट इतकी कमी राहिली.
मालमतत्ता क्षेत्रातील सल्लागारांनी या लघु बाजारपेठेतील सरासरी किमान मूळ किमतींची तुलना दोन वर्षातील सरासरी किमतीशी केल्यानंतर हा निष्कर्ष निघाला आहे. नवीन प्रकल्पांच्या किमतींबाबतीत गोरेगावनंतर ठाण्यात त्या खालोखाल म्हणजे १८ टक्क्यांनी घट झाली आहे. तर दिल्लीनजीक गुरगाव येथेही १० टक्क्यांची घट झाली आहे.
बंगळुरूत अनेक उपबाजारपेठांमध्ये स्थिर किमती राहिल्या असून अतिदक्षिण आणि पश्चिमेकडील भागात मात्र २ ते ७ टक्क्यांनी घट झाली. इंडिया कुशमन अँड वेकफिल्डने हा निष्कर्ष जारी केला आहे. द्वारका एक्स्प्रेसवे, न्यू गुरगाव साऊथ पेरिफेरल रोड, नॉएडा एक्स्प्रेसवे, ठाणे, गोरेगाव आणि मालाड येथील विकासकामांचीही दखल अहवालात घेण्यात आली आहे.
खरेदीदारांचा रस संपल्याने नवीन प्रकल्प सुरू करण्याच्या संख्येतही घट झाली आहे. दिल्ली एनसीआर भागात २०१५ मध्ये २३,००० नवीन युनिट्स सुरु करण्यात आली असून त्यापैकी ७९ टक्के द्वारका एक्स्प्रेसवे भागात होती.
मुंबईत मात्र निवासी प्रकल्प सुरु करण्याच्या संख्येत ३७ टक्के घट झाली. मुलुंड, गोरेगाव, ठाणे आणि मालाड परिसरात १५,७३५ युनिट्स सुरू करण्यात आली. नवीन सुरु करण्यात आलेले प्रकल्पही आकाराने लहान असल्याने त्यांच्या किमती कमी ठेवल्या आहेत.