कल्याण : कल्याणच्या प्रणव धनावडेनं क्रिकेटच्या मैदानावर सध्या धुमशान घातलंय. प्रणवने ३२३ चेंडूत तब्बल १००० धावा कुटत क्रिकेटच्या जगतात प्रथमच सहस्त्रक पूर्ण केलंय. एका डावात १००० धावा पूर्ण करणारा प्रणव क्रिकेटच्या इतिहासात पहिला खेळाडू ठरलाय. हजार धावा पूर्ण करताना त्याने १२७ चौकार आणि ५९ षटकांर लगावलेत.
एचटी भंडारी टुर्नामेंटमध्ये तो एकामागून एक विक्रमाला गवसणी घालतोय. त्यानं १८९९ साली इंग्लंडच्या आर्थर कॉलिन्सचा ६२८ रन्सचा रेकॉर्ड मोडित काढला. तर रिझवी शाळेच्या पृथ्वी शॉ यानं काही वर्षांपूर्वी याच स्पर्धेत ५४६ धावांचा रेकॉर्ड केला होता. त्यानं हे दोन विक्रम रेकॉर्ड मोडीत काढले.
दरम्यान, प्रणवच्या क्रीडा प्रशिक्षण आणि शिक्षणाचा सर्व खर्च उचलणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केलीय. क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केलीय. तसेच कल्याण डोंबिवली महानगर पालिकेकडूनही त्याचा गौरव केला जाणार आहे.
कल्याणचा विक्रमवीर प्रणव धनावडेनं कठीण परिस्थितीवर मात करत आपल्या वडिलांचं स्वप्न साकार केलंय. त्याचे वडिल रिक्षा ड्रायव्हर आहेत. आणि त्यांच्या मुलानं क्रिकेटजगतामध्ये आपल्या अचाट खेळीनं एखच खळबळ माजवली आहे.