नवी मुंबई / दीपक देशमुख
इंडिया रेटींग ण्ड रिसर्च या देशातील मान्यताप्राप्त संस्थेच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिकेस “AA+ Stable” पत हे मानांकन जाहीर करण्यात आले असून यामधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या आर्थिक सक्षमतेवर मान्यतेची मोहर उमटली आहे.
मुंबईच्या वाढत्या गर्दीला पर्याय म्हणून नवी मुंबईची निर्मिती करण्यात आल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा पुरवित नवी मुंबई बाहेरील लोकांपुढे नवी मुंबई हे निवासायोग्य उत्तम शहर असल्याची प्रतिमा निर्माण केली आहे. त्याशिवाय मुंबईच्या तुलनेत चांगले पर्यावरण व वातावरण नवी मुंबईत उपलब्ध होत असल्याने शिवाय मुंबईमधील अशाप्रकारच्या सुविधाजनक विभागांच्या तुलनेत घरांचे दर कमी असल्याने नवी मुंबईला नागरिक राहण्यासाठी विशेष पसंती देत आहेत. यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका करीत असलेला पाणी पुरवठा, शहरातील स्वच्छता, घनकचर्याची विल्हेवाट पध्दत, मलनि:स्सारण व्यवस्था अशा प्रमुख नागरी सुविधांमध्ये महानगरपालिकेने केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामाचा मोठा वाटा असल्याचे आर्थिक क्षमता श्रेणी देताना विशेषत्वाने नमूद करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिका मोठ्या स्वरुपातील नागरी सुविधांची भांडवली कामे स्वत:च्या उत्पन्नातून करीत असल्याची विशेष नोंद घेत शासकीय अनुदानावर अवलंबून न राहता स्वक्षमतेवर विकास कामे करण्याची नवी मुंबई महानगरपालिकेची क्षमता असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेचा उत्पन्नवाढीचा दर १७.३ टक्के इतका चांगला असून महानगरपालिकेचे प्रमुख उत्पन्न स्त्रोत उपकर / एल.बी.टी. चा उत्पन्न विकास दर २०.७ टक्के इतका उत्तम असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. यापुढील काळात एल.बी.टी. बंद झाल्यामुळे शासकीय अनुदानवर अवलंबुन रहावे लागणार असल्याचे निरीक्षणही नोंदविण्यात आलेले आहे.
इंडिया रेटींग ण्ड रिसर्च सारख्या मान्यताप्राप्त संस्थेने नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजाचा आढावा घेऊन“AA+ Stable” ही उच्च आर्थिक क्षमता श्रेणी महानगरपालिकेस प्रदान केली आहे. यामुळे नवी मुंबई महानगरपालिका दर्जात्मक नागरी सुविधा पुर्तीसाठी सक्षम असल्याचे गुणवत्तापत्र प्राप्त झाले असल्याबद्दल महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांनी समाधान व्यक्त केले असून या मानांकनामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्व कार्यक्षमतेवर दर्जात्मक ठसा उमटला असल्याची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड यांनी दिली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेस“AA+ Stable” हे मानांकन प्राप्त झाल्याबद्दल नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, स्थायी समिती सभापती सौ. नेत्रा शिर्के, सभागृहनेता जयवंत सुतार, विरोधी पक्षनेता विजय चौगुले आणि पदाधिकारी, नगरसेवक नगरसेविका यांनी अभिनंदन केले आहे.