नवी मुंबई / दीपक देशमुख
प्रभाग ८८ मधील होत असलेली पोटनिवडणूक रंगतदार टप्प्यात आली असून कॉंग्रेसने प्रारंभापासून आजतागायत घरटी प्रचारावरच भर दिला आहे. कॉंग्रेसची ही निवडणूक कॉंग्रेसचे नेरूळ भागातील स्टार नेते संतोष शेट्टी यांच्या जनसंपर्कावरच अवलंबून आहे. संतोष शेट्टी यांचा घरटी असलेला जनसंपर्क व त्यांनी केलेली या ठिकाणी कामे यामुळेच या पोटनिवडणूकीत कॉंग्रेसचाच उमेदवार विजयी होणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी दिली.
कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपा अशी तिरंगी लढत होत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या अपघाती मृत्यूमुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून लोकनेते गणेश नाईक, माजी खासदार डॉ. संजीव नाईक, आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक यांच्यासह जयवंत सुतार, माधुरी सुतार, रविंद्र इथापे, नेत्रा शिर्के, सुरज पाटील आदी मातब्बर फौज निवडणूक प्रचारात सहभागी झाली असून भाजपा-शिवसेनेकडून खासदार राजन विचारे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपनेते विजय नाहटा, विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शहरप्रमुख विजय मानेसह शिवसेना पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक , भाजपाकडून आमदार सौ. मंदाताई म्हात्रेसह भाजपा पदाधिकारी कंबर कसून प्रचारात सहभागी झालेे आहेत. कॉंग्रेसकडून उपमहापौर अविनाश लाड, जिल्हाध्यक्ष दशरथ भगत, ठाणे लोकसभा अध्यक्ष निशांत भगत, माजी नगरसेवक व ज्येष्ठ नेते संतोष शेट्टी, कामगार नेते रविंद्र सावंत आदी मंडळी प्रचार अभियानात सहभागी झाली आहेत.
या प्रभागातून कॉंग्रेसचा उमेदवार सौ. नुतन दिगंबर राऊतच विजयी होणार आणि संतोष शेट्टीच या विजयाचे किंगमेकर असणार असल्याचे कामगार नेते रविंद्र सावंत यांनी सांगितले.
शिवसेना-भाजपा आणि राष्ट्रवादीकडून सभा, चौकसभांचा धुराळा उडत असतानाच कॉंग्रेसने प्रारंभापासून घरटी जनसंपर्कावर व घराघरातील मतदारांशी सुसंवादावर भर दिला आहे. या प्रभागात नेरूळ सेक्टर ३ व सेक्टर १५ या परिसराचा समावेश आहे. या प्रभागात शालेय-महाविद्यालयीन ऍडमिशन, शैक्षणिक फी सहकार्य, रूग्णालयीन सहकार्य यामुळे कॉंग्रेसचे संतोष शेट्टी खर्या अर्थाने जनताभिमुख आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपा परस्परावर आरोपामध्ये व्यस्त असल्याने कॉंग्रेसने विकासाच्या मुद्यावर व समस्या निवारणाच्या संकल्पनेवर भर दिला असून मतदारांचा कल कॉंग्रेसकडेच झुकत असल्याचा दावा कामगार नेते रविंद्र सावंत यांनी केला आहे.