१३५ वर्षाचा जुना हकॉक पुल तोडणार
१५० उपनगरीय लोकल फेऱ्या रद्द
४२ लांब पल्ल्याच्या रेल्वे रद्द
सीएसटीला शनिवारी १२.१०ची शेवटची लोकल
मुंबई : महापालिका व मध्य रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार भायखळा व सॅण्डहर्स्ट रोड येथील १३५ वर्षे जुना हकॉक पुल तोडण्यात येणार असून या कामाकरता मध्य रेल्वे १८ तासाचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. शनिवारी रात्री १२.२० पासून रविवारी संध्याकाळी ६.२० पर्यत हा मेगाब्लॉक असणार आहे.
या मेगाब्लॉकमुळे उपनगरीय रेल्वे सेवेवर व लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवेवर परीणाम होणार आहे. १० जानेवारीला हा पुल तोडण्याची परवानगी रेल्वे बोर्डाने दिली आहे. हॅकाक पुल तोडण्यासाठी मध्य रेल्वेकडून ३०० टन वजनाची क्रेन वापरली जाणार आहे. त्या ठिकाणी असणारे पोल, ओव्हर हेड वायर व अन्य सामुग्रीदेखील याच कालावधीत हलविली जाणार आहे. ब्रीज तोडताना व साहीत्य हलविताना अन्य कोणाला त्रास होणार नाही यासाठी मध्य रेल्वे व मुंबई महापालिकेकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. रविवारी मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील रेल्वे भायखळा ते कुर्ला यादरम्यानच चालविली जाणार आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील सीएसटी ते पनवेल व सीएसटी ते अंधेरी या रेल्वे सेवांवर या कामाचा कोणताही परीणाम होणार नाही. या कामाकरता मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील १५० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
६२६ रेल्वे फेऱ्यापैकी ४७६ रेल्वे फेऱ्या भायखळा ते कुर्ल्यापर्यत चालविण्यात येणार आहेत. लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या दादर, लोकमान्य टिळक टमिर्नस, कल्याण व पनवेल येथून सोडण्याची तयारी मध्य रेल्वेने केली आहे. पुल तोडण्याच्या कामास शनिवारी मध्यरात्री १२.२० पासून सुरूवात होणार असून शनिवारी मध्यरात्री १२.१० वाजता सीएसटीहून कसाऱ्याकरता शेवटची लोकल सोडण्यात येणार आहे. १२.३०ची कसारा जाणारी लोकल भायखळा रेल्वे स्टेशनवरून सोडण्यात येणार आहे. सीएसटीला येणारी शेवटची लोकल आसनगावहून येणारी असेल व ती १२.१८ला सीएसटीला पोहोचेल. मध्यरात्री १.३० ला सीएसटी ला येणारी शेवटची लोकल भायखळ्यापर्यतच चालविण्यात येणार आहे.
रेल्वे प्रवाशांना या मेगाब्लॉकच्या त्रासातून काही प्रमाणात सुटका व्हावी याकरता मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावर अधिक रेल्वे या काळात चालविण्यात येणार आहेत. हार्बर रेल्वे मार्गावर या कालावधीत ४४६ रेल्वे फैऱ्या न चालविता ५७६ रेल्वे फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. टॉर्न्स हार्बर रेल्वे मार्गावर १८६ रेल्वे फेऱ्या न चालविता २१० रेल्वे फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. रविवारच्या दिवशी हार्बर रेल्वे मार्गावर कोठेही मेगाब्लॉक ठेवंण्यात आलेला नाही. हॅकाक पुल तोडल्याने लोकल रेल्वे व लांब पल्ल्याच्या रेल्वेची गती वाढण्यास मदत होणार असल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.