नवी मुंबई : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेला देशात तृतीय तर राज्यात सर्वप्रथम क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले असून हे मानांकन उंचाविण्यासाठी लोकप्रतिनिधी, प्रशासन, स्वयंसेवी संस्था, मंडळे व नागरिक यांच्या एकत्रित सहभागातून व्यापक प्रयत्न करण्यात येत आहेत.
या अनुषंगाने केंद्रीय नगरविकास मंत्रालय यांचेमार्फत भारतातील १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तसेच देशातील राज्यांच्या राजधान्यांसहीत मुख्य ७५ शहरांचे स्वच्छ शहर सर्वेक्षण क्वालिटी कंट्रोल ऑफ इंडिया (क्यू.सी.आय.) या मान्यताप्राप्त नामांकित एजन्सीमार्फत केले जात आहे. यामध्ये मुख्यत्वे घनकचरा व्यवस्थापन तसेच घरगुती व सामुदायिक शौचालय बांधकाम याचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
यामध्ये नागरिक केंद्र सरकारने जाहीर केलेल्या १८००२६७२७७७ या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आपल्या स्वच्छतेबाबतच्या प्रतिक्रिया विनामूल्य नोंदवू शकतात. या टोल फ्री क्रमांकावर मिस्ड कॉल दिल्यानंतर आपल्याला आपल्या नंबरवर रिटर्न कॉल येईल व आपणांस हिंदी (१) अथवा इंग्रजी (२) असा भाषेचा पर्याय निवडावा लागेल. हा पर्याय निवडल्यानंतर आपणांस आपल्या विभागाचा पिनकोड नंबर टाकावा लागेल. पिनकोड नंबर टाकल्यानंतर आपणांस शहरच्या स्वच्छतेविषयी व शौचालयाविषयी प्रश्न विचारण्यात येतील त्यांची उत्तरे १, २, ३ अशा पर्यायांमध्ये द्यावयाची आहेत. हा टोल फ्री क्रमांक १५ जानेवारी २०१६ पर्यंत कार्यरत असणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता अभियान विषयक कामाचे मूल्यांकन प्रक्रिया २० जानेवारी २०१६ पर्यंत असणार आहे. तरी नवी मुंबईतील प्रत्येक नागरिकाने आपल्या शहराचे स्वच्छतेविषयक देशातील मानांकन उंचाविण्यासाठी आपला सहभाग देण्याच्या दृष्टीने शहर स्वच्छतेविषयी आपली भूमिका १८००२६७२७७७ या टोल फ्री क्रमांकावर आवर्जुन नोंदवावी असे आवाहन नवी मुंबईचे महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.