नवी मुंबई / दीपक देशमुख
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात बॅनर्स, जाहिराती, पोस्टर्स, भित्तीपत्रके, भिंतीवरील घोषवाक्ये, भिंतीवर जाहिराती करणे इत्यादींकरीता महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार परवानगी घेणे आवश्यक आहे. याबाबत विनापरवानगी जाहिरात करणार्यांवर वेळोवेळी कारवाई करण्यात येत असते. अशाचप्रकारे सेक्टर १७ वाशी येथे पदपथालगत विनापरवानगी जाहिरात लावणार्या दिशा कॉप्युटर इन्स्टिट्युट तसेच मुझे द वेलनेस स्पा या व्यावसायिकांवर महाराष्ट्र मालमत्ता विरुपण प्रतिबंधात्मक कायदा १९९५ चे कलम ३ व ४ चे उल्लंघन करून शहर सौंदर्यीकरणास बाधा आणल्याने संबंधितांच्या विरोधात अतिरिक्त आयुक्त शहर अंकुश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वाशी विभाग अधिकारी महेंद्रसिंग ठोके यांनी वाशी पोलीस ठाणे येथे रितसर फिर्याद दाखल केलेली आहे.
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्राचा परिसर स्वच्छ व सुंदर राहण्यासाठी येथील प्रत्येक घटकाचे योगदान आवश्यक असून नागरिकांनी याकामी महानगरपालिकेस सहकार्य करावे व परवानगी घेऊनच सुनिश्चित केलेल्या योग्य ठिकाणीच जाहिराती प्रदर्शित कराव्यात तसेच विनापरवानगी जाहिरात केल्यास कायदेशीर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नये असे आवाहन महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या वतीने करण्यात येत आहे.