* कॉंग्रेस नेते रविंद्र सावंत यांचा सिडको, महापालिका, पोलीस मुख्यालय,मुख्यमंत्री, पालकमंत्री सर्वाकडे पाठपुरावा
* गॅसच्या गोडाऊनला एमआयडीसी परिसरात स्थंलातरीत करण्याची मागणी
नवी मुंबई : जुईनगर सेक्टर २५ परिसरातील निवासी परिसरात, पेट्रोलपंपालगत व शाळेलगत सुरू होत असलेले गॅसच्या गोडाऊनला रहीवाशांचा तीव्र विरोध असून या ठिकाणी गॅसचे गोडाऊन सुरू होवू नये कॉंग्रेसचे रोजगार व स्वंयरोजगार विभागाचे नवी मुंबई अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांनी नवी मुंबईचे महापौर, उपमहापौर, मनपा आयुक्त, मुख्यमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते पोलीस आयुक्त आदींना लेखी निवेदन सादर केले आहे. या निवेदनात निवासी परिसरातील गॅसचे गोडाऊन एमआयडीसी परिसरात स्थंलातरीत करण्याची मागणी केली आहे.
जुईनगर, सेक्टर २५ परिसरातील प्लॉट २ वर एचपी कंपनीच्या गोडाऊनचे काम सुरू आहे. या भुखंडाला लागूनच माता अमृतानंदमयी शाळा आहे. या शाळेत बालवाडी ते बारावीपर्यतची मुले शिक्षण घेत आहेत. समोरच्या बाजूला पेट्रोलपंप आहे. सभोवाताली सिडकोच्या सर्व गृहनिर्माण सोसायट्या आहेत. भुखंडाच्या मागील बाजूस क्रिडांगण असून सकाळ – संध्याकाळ मुले मोठ्या संख्येने येथे खेळत असतात. गतवर्षी नेरूळ सेक्टर १६ येथील सिडकोच्या पंचरत्न सोसायटीत गॅसदुर्घटना आजही अंगावर शहारे आणत आहे. भविष्यात या ठिकाणी गॅस दुर्घटना झाल्यास लगतचा पेट्रोलपंप व निवासी परिसर पाहता जुईनगर, नेरूळ व शिरवणे भागाला फार मोठी जिवित व वित्त हानीची किमंत मोजावी लागणार असल्याची भीती रविंद्र सावंत यांनी निवेदनातून व्यक्त करताना समस्येचे गांभीर्य संबंधितांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
गॅस गोडाऊनमुळे भविष्यात मृत्यूची टांगती तलवार पाहून स्थानिक रहीवाशांमध्ये संतापाचे सूर उमटू लागले आहेत. यातून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता रविंद्र सावंत यांनी निवेदनात व्यक्त केली आहे.
रहीवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करता गॅस गोडाऊन निवासी परिसरात न ठेवता एमआयडीसी परिसरात स्थंलातरीत करावा आणि रहीवाशांच्या मनात निर्माण झालेले भीतीचे मळभ दूर करण्याची मागणी रविंद्र सावंत यांनी केली आहे.