* आ.संदीप नाईक यांचे प्रतिपादन
* गोठीवलीत ४०+ मास्टर क्रिकेट स्पर्धेचा शानदार शुभारंभ
नवी मुंबई : नवी मुंबई शहर क्रीडा, कला आणि संस्कृती जोपासणारे शहर आहे. शहरातील नवोदीत खेळाडूंना ४०+ मास्टर क्रिकेट स्पर्धेसारखा उपक्रम प्रेरणा देणारा आहे, असे प्रतिपादन आ.संदीप नाईक यांनी केले. ४०+ मास्टर क्रिकेटर्स असोसिएशन, नवी मुंबई यांच्यावतीने न्यू स्टार मित्रमंडळाच्या पटांगण गोठीवली गांव (नवी मुंबई) आयोजित क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ आ.नाईक यांच्याहस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
खारीगांव ते बेलापूर पट्टीतील आगरी कोळी समाजातील मास्टर प्रदीप पाटील (तुर्भेगाव) यांच्या संकल्पनेतून ४० + मास्टर क्रिकेट स्पर्धा मागील ९ वर्षांपासून विविध गावांमध्ये आयोजित करण्यात येते. यंदाच्या स्पर्धेचा मान गोठीवली गावाने मिळविला आहे. ८ ते १० जानेवारी या कालावधीत ही स्पर्धा होणार असून आज (ता.८) मान्यवरांच्या उपस्थित याचा शुभारंभ करण्यात आला.
या क्रिकेट सामन्याच्या सुरुवातीला दिघा विरुध्द दारावे संघांचा सामना खेळण्यात आला. त्यानंतर सानपाडा विरुध्द घणसोली संघाच्या सामन्यांमध्ये सानपाडा संघाने बाजी मारली. त्यानंतर सानपाडा विरुध्द शिरवणे सामन्यांमध्ये पुन्हा एकदा आपले अस्तित्व टिकवून सानपाडा संघ विजयी ठरला. त्यानंतर खारीगांव व कळवा संघामध्ये सामना झाला असून यामध्ये खारीगांव संघ विजयी ठरला आहे. तसेच विजयी संघ खारीगांव व शंकरवाडी करावेमध्ये रंगलेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये खारीगांवने विजय पटकाविला. या सामन्यानंतर जुहू व खारीगांवमध्ये सामना झाला असून यात जुहू संघ विजयी ठरला.
‘स्वास्थ्य शरीर, आयुष्य महान’ या विचाराने प्रेरित होऊन क्रिकेटची मैदान गाजवलेल्या माजी किक्रेटपटूंना परत एकदा मैदानावर खेळता यावे यासाठी या ४०+ क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मास्टर प्रदीप पाटील यांनी दिली.
या कार्यक्रमाला मास्टर प्रदीप पाटील, ४०+चे बळीराम पाटील, नवी मुंबई महापालिकेचे नगरसेवक लक्ष्मीकांत पाटील, प्रदीप म्हात्रे, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, माजी सरपंच डी.बी.म्हात्रे, ग्रामस्थ मंडळाचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ म्हात्रे, उपाध्यक्ष जयराम म्हात्रे, ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष धोंडू म्हात्रे आदी मान्यवर, नवी मुंबईकर क्रिकेटप्रेमी नागरिक उपस्थित होते.