नवी मुंबई : महापालिका प्रभाग ८८ करता रविवारी मतदान होत असून याच दिवशी मतमोजणीही केली जाणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस, भाजपा आणि कॉंग्रेस अशी तिरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाने प्रचारादरम्यान परस्परांवर आरोपांची राळ उडविल्याने ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून शिल्पा कांबळे, भाजपाकडून सरस्वती पाटील, कॉंग्रेसकडून नुतन राऊत निवडणूक रिंगणात उमेदवार आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेविका शशिकला मालादी यांच्या मृत्यूमुळे ही पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सुरेश शेट्टी व कॉंग्रेसचे संतोष शेट्टी या दोन शेट्टीच्याच व्यक्तीगत करिश्मावर या दोन्ही पक्षांचे मतदान अवलंबून आहे. राष्ट्रवादी कॉग्रेस व भाजपाकडून रथी-महारथी प्रचारअभियानात उतरवले असतानाच कॉंग्रेसने मात्र आरोप-प्रत्यारोपावर भर न देता घरटी प्रचारावरच भर दिल्याचे पहावयास मिळत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक, माजी महापौर सागर नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, युवक जिल्हाध्यक्ष सुरज पाटील, महिला जिल्हाध्यक्ष माधुरी सुतार, महापौर सुधाकर सोनवणे, सभागृहनेते जयवंत सुतार, स्थायी समिती सभापती नेत्रा शिर्के, नगरसेवक रविंद्र ईथापे, माजी नगरसेवक सुरेश शेट्टी यांच्यासह पक्षीय पदाधिकारी व अन्य नगरसेवक प्रचारात उतरविले आहेत.
शिवसेना-भाजपाने आपल्या उमेदवार सरस्वती पाटील यांच्या प्रचाराकरता खासदार राजन विचारे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उपनेते विजय नाहटा, भाजपाच्या बेलापुर आमदार मंदा म्हात्रे, मनपा विरोधी पक्षनेते विजय चौगुले, शहरप्रमुख विजय मानेंसह शिवसेना-भाजपाचे नगरसेवक व पक्षीय पदाधिकारी प्रचारात उतरले आहेत. कॉंग्रेसकडून उपमहापौर अविनाश लाड, जिल्हाप्रमुख दशरथ भगत, ठाणे युवक जिल्हाध्यक्ष निशांत भगत, रोजगार-स्वंयरोजगारचे नवी मुंबई अध्यक्ष व कामगार नेते रविंद्र सावंत यांच्यासह कॉंग्रेसचे नगरसेवक व पक्षीय पदाधिकारी प्रचारात सहभागी सहभागी झाले होते.
भाजपा आमदार मंदा म्हात्रे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी आमदार गणेश नाईक यांच्या प्रचारातील राजकीय जुगलबंदीने पोटनिवडणूक चुरशीची झाली आहे. कॉंग्रेसच्या तुलनेत भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही निवडणूक अधिक प्रतिष्ठेची केल्याचे दिसून आले. या निवडणूकीत मतदारांना मोठ्या प्रमाणावर पैशाचे वाटप झाले असल्याचा आरोप भाजपा व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून परस्परांवर केला जात आहे. पोटनिवडणूकीचा नवी मुंबईतील ईतिहास राष्ट्रवादी कॉंग्रेसला फारसा अनुकूल नसला तरी या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस विजयी बाजी मारून पोटनिवडणूकीचा ईतिहास बदलेल असा विश्वास राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी व्यक्त केला आहे. मतदान संपल्यावर अर्ध्या तासातच मतमोजणीला सुरूवात होणार असून आठ वाजेपर्यत या पोटनिवडणूकीचा निकाल लागणे शक्य आहे. पोटनिवडणूकीत प्रभागातील स्थानिक मुद्याकडे राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाने लक्ष न देता परस्परावरच आरोपात वेळ घातला आहे तर दुसरीकडे कॉंग्रेसने घरटी जनसंपर्क व प्रचार केल्याने मतदार यावेळी कॉंग्रेसलाच विजयी करणार असल्याचा विश्वास कामगार नेते रविंद्र सावंत यांनी व्यक्त केला आहे.