*आमदार संदीप नाईक यांच्या पाठपुराव्याला यश
* पोलीस ठाण्यांच्या डागडुजीसाठी आर्थिक तरतूद
नवी मुंबई : रबाळेतील पोलीस वसाहतींची दुरुस्ती व्हावी, यासाठी आमदार संदीप नाईक सातत्याने शासन दरबारी प्रयत्न करीत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून शासनाच्या गृह विभागाने या वसाहतीच्या दुरुस्तीसोबतच नवी मुंबईतील विविध पोलीस ठाणी आणि बेलापूरच्या मुख्यालयाच्या दुरुस्तीसाठी ४ कोटी ८१ लाख १४ हजार रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
रबाळे येथे पोलीसांची जुनी वसाहत आहे. मात्र या वसाहतीची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. इमारतींना तडे गेलेले आहेत. घरांच्या आतील भागांची देखील दुरावस्था झालेली आहे. आमदार संदीप नाईक यांनी या इमारतींची प्रत्यक्ष पाहणी देखील केली होती. या वसाहतीची तातडीने दुरुस्ती व्हावी, या मागणीसाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना १९ ऑगस्ट २०१५ रोजी पत्र दिले होते. त्याचप्रमाणे गृहविभागाचे अप्पर मुख्य सचिव यांना देखील १९ ऑगस्ट २०१५ रोजी या संबधी लेखी पत्र दिले होते. २०१५-१६च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठी निधीची तरतूद तातडीने करुन दुरुस्तीचे काम हाती घेण्याची मागणी केली होती.
आमदार संदीप नाईक यांनी मागणी केल्याप्रमाणे रबाळे आणि तुर्भे येथील पोलीस वसाहतींमधील इमारतींच्या दुरस्तीसाठी ३ कोटी ४९ लाख ९२ हजाराच्या निधींसाठी गृह विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्याचबरोबर रबाळे, तुर्भे, एपीएमसी, बेलापूर येथील पोलीस ठाणी आणि पोलीस चौक्यांसाठी तसेच बेलापूर येथील पोलीस आयुक्त कार्यालयासाठी १ कोटी ३१ लाख २२ हजार निधीसाठी मान्यता दिली आहे. दुरुस्तीची कामे सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत केली जाणार आहेत.
गृह विभागाच्या या निर्णयानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी समाधान व्यक्त केले असून आमदार संदीप नाईक यांचे आभार मानले आहेत.