नवी मुंबई /सुजित शिंदे
उंदरांच्या त्रासापासुन अहोरात्र मूषक नियत्रंण विभाग कार्यरत आहे. तथापि गेल्या काही वर्षापासून मूषक नियत्रंणच्या कर्मचार्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागत असतानाही त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने संबंधित कामगारांची आई जेवू घालिना अन् बाप भिक मागू देईना अशी अवस्था झालेली आहे.
मूषक नियत्रंण विभागात 50च्या आसपास कर्मचारी कार्यरत असून मनी नावाच्या ठेकेदाराच्या माध्यमातून गेली काही वर्ष मूषक नियत्रंण विभाग चालविला जात आहे. दिवसा व रात्री अशा दोन पाळ्यांमध्ये नवी मुंबईत मूषक मारण्याचे काम केले जाते. गेल्या काही वर्षापासून मूषक नियत्रंणच्या कामगारांचे वेतन सातत्याने तीन ते चार महिने विलंबानेच होेत आहे. आज महापालिकेचे कर्मचारी डिसेंबर महिन्याचे वेतन घेत असताना मूषक नियत्रंणच्या कामगारांना नोव्हेंबर महिन्याचेही वेतन मिळालेले नाही. कंत्राटी कामगारांना 7 हजार 500 रूपये दिवाळी बोनस मिळाल्याचा डिंगोरा सर्वत्र पालिका प्रशासनाकडून पिटला जात असला तरी ठेकेदाराकडून मूषक नियत्रंणच्या कामगारांच्या हातावर अवघे पाच हजार रूपयेच टेकविण्यात आले आहेत.
मूषक नियत्रंणच्या कामगारांना अवघ्या पाच हजार रूपयांवरच काम करावे लागत होते. नवी मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार व सामाजिक चळवळीतील शिलेदार संदीप खांडगेपाटील यांनी ही बाब आमदार संदीप नाईकांच्या निदर्शनास आणून देताना, पाठपुरावा केल्यामुळे मूषक नियत्रंणच्या कामगारांना दहा हजार रूपये वेतन लागू झाले. आमदार संदीप नाईकांनीही मूषक नियत्रंणच्या कामगारांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयास केले आहेत.
मूषक नियत्रंणच्या कामगारांना मूषक मारण्यासाठी औषध मिश्रित हाताने तयार करावे लागते. पालिका प्रशासनाकडून तसेच ठेकेदाराकडून मूषक नियत्रंणच्या कामगारांना ग्लोव्हजही उपलब्ध करून दिले जात नाही. हात धुण्यासाठी साबणही दिला जात नाही. रात्रीच्या अंधारात मूषक शोधण्यासाठी विजेरी (बॅटरी)देखील कामगारांना आपल्या घरूनच स्वत:ची आणावी लागते. मूषक नियत्रंण कामगारांच्या जवळील पिशवीची झडती घेतल्यास आपणास साबण, विजेरी व अन्य साहीत्य पहावयास मिलेल. महापालिका मुख्यालयात अनेक कामगार संघटना कार्यरत असतानाही मूषक नियत्रंण कामगारांची कोणी गांभीर्याने दखल घेत नसल्याचे पहावयास मिळत आहे.