कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र कचरामुक्त होण्यावर आपला अधिक भर राहणार असल्याचे प्रतिपादन स्थायी समितीचे नवनिर्वाचित सभापती संदीप गायकर यांनी केले. स्थायी समिती सभापती पदासाठी गायकर यांचाच अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड निश्चित होती. आज त्यांनी स्थायी समिती सभापती पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना गायकर यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
आजच्या घडीला कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात कचर्याचा प्रश्न अतिशय गंभीर झाला असून तो सोडविण्यासाठीच आपण सर्वप्रथम प्रयत्न करू. महापालिकेचे विद्यमान आयुक्त ई. रविंद्रन यांनीही महापालिका क्षेत्रात स्वच्छतेच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आपल्या सर्व लोकप्रतिनिधींनींही साथ देणे आवश्यक आहे. त्यामुळे जे जे नगरसेवक आपल्या प्रभागाला कचराकुंडी मुक्त करतील अशा सर्व लोकप्रतिनिधींच्या प्रभागासाठी अर्थसंकल्पात आपण अधिकाधिक निधी देण्याची घोषणाही संदीप गायकर यांनी यावेळी केली. या गोष्टीमुळे शहरवासीयांचे आरोग्य सुधारून कल्याण-डोंबिवली ही दोन्ही शहरेही सुंदर बनतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल गायकर यांचे अभिनंदन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान या पदासाठी भाजपातील इतर काही नगरसेवकांची नावेही चर्चेत होती. मात्र पक्षनेतृत्वाने गायकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले हे महत्वाचे पद कल्याण शहर भाजपला देऊन इथल्या पदाधिकार्यांना अधिक बळ देण्यात आल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी व्यक्त केली.
संदीप गायकर यांच्याकडे नगरसेवकपद तसेच स्थायी समिती सदस्य या दोन्ही पदांचा दांडगा अनुभव आहे. तसेच ते गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात सक्रीय कार्यरत असून त्यांनी आमदारकी आणि खासदारकी निवडणूकीत भाजप उमेदवारांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका निभावली आहे. तर संदीप गायकर यांच्यावर कोणत्याही गटा-तटाची छाप नसून कल्याण डोंबिवलीतील भाजप आमदारांबरोबर असलेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे त्यांच्या नावाला कोणीही विरोध केला नाही. तर भाजपसह इतर सर्वच पक्षांमधील पदाधिकार्यांशी त्यांचे असलेले सलोख्याचे संबंध आगामी काळात महत्वाचे ठरणार आहेत. तर २०१० च्या महापालिका निवडणूकीत त्यांनी पक्षासाठी आपला वॉर्ड सोडला होता. एक अभ्यासू नगरसेवक म्हणून त्यांचे नाव ओळखले जात असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोपही नाहीत. या आणि अशा अनेक महत्वाच्या गोष्टी विचारात घेऊन गायकर यांना सभापतीपद देण्यात आले आहे.