* घरगुती शौचालय, हगणदारीमुक्तीसाठी अधिकार्यांची जनजागृती
नवी मुंबई / दीपक देशमुख
घर स्वच्छ राहिले तर गाव स्वच्छ राहिल गाव स्वच्छ राहिले तर शहर स्वच्छ राहिल. देश स्वच्छ राहिले तर राज्य स्वच्छ राहिल, पर्यायाने आपली नवी मुंबई ही स्वच्छ राहिल. स्वच्छतेमुळे देशाचे आरोग्यही स्वच्छ राहण्यास मदत होईल, असा संदेश देत पालिकेच्या दिघा प्रभाग समितीच्यावतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अभियानांचा जागर करण्यात येत आहे. या योजनेनुसार प्रभागातील नागरिकांसाठी घरगुती शौचालय बांधण्यात येणार आहे. दिघा प्रभाग समितीचे विभाग अधिकारी गणेश आघाव यांनी या योजनेचा जास्तीजास्त नागरिकांना लाभ घेता यावा आणि दिघा प्रभाग संपुर्ण हगणदारी मुक्त व्हावा यासाठी जनजागृती अभियान सुरु केले आहे.
या विषयी अधिक माहिती देताना दिघा विभाग अधिकारी गणेश आघाव म्हणाले की, केंद्र आणि राज्यस्तरावर राबविण्यात येत असलेल्या निर्मल भारत अभियानाचे नामकरण ‘स्वच्छ भारत मिशन’ असे करण्यात आले आहे. या मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्याने दिघा परिसरात देखील झोपडपट्टी भागातील नागरिकांसाठी घरगुती शौचालय बांधण्यात येणार आहे. केंद्र आणि राज्य शासन, महापालिकेचा आर्थिक हातभार यात असणार आहे. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या सूचनेनुसार अतिरिक्त आयुक्त अंकुश पाटील, नोडल ऑफीसर सुरेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिघा आणि नवी मुंबई महापालिका परिसरातील झोपडपट्टीत घरगुती शौचालय उभारण्यात येणार आहेत.
दिघा प्रभाग समिती अंतर्गत बांधण्यात येणार्या शौचालयाची प्रतिकृती कार्यालयात दाखल झाली आहे. त्याची माहिती व्हावी आणि नागरिकांना शौचालय योजनेचा लाभ घेता यासाठी विभाग अधिकारी आघाव यांनी नागरिकांसाठी माहितीपर जनजागृती केली. यात पाणी उपलब्धता, पाणी साठवण, हात धुणे व शौचालय स्वच्छता या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशनमधून प्रोत्साहनपर अनुदान दोन टप्प्यात देण्यात येणार आहे.या व्यतिरिक्त कोणत्याही उच्च तंत्रज्ञानाचा वापर लाभार्थी करू शकेल. पण त्यासाठी लागणारा अतिरिक्त खर्च लाभार्थ्याने स्वतः सोसावयाचा आहे. डी.जे.इन्फ्रास्टक्चर या कंपनीने शौचालय बनविले आहे. दिघा परिसरातील नागरिकांसाठी याचे अर्ज प्रभाग कार्यालयात उपलब्ध आहेत, अशी माहिती अधिकारी आघाव यांनी दिली.