नवी मुंबई / दीपक देशमुख
नेरूळ सेक्टर १२मधील रामलीला मैदानावर सुरू असलेल्या आगरी-कोळी महोत्सवामध्ये बच्चेकंपनीसह खवय्यांची चंगळ होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
आगरी-कोळी महोत्सवामध्ये चार दिवसामध्ये ५० हजाराहून अधिक लोक सहभागी झाले असून दररोज सरासरी १८ ते २० हजार लोक सांयकाळी ६ ते रात्रौ १० ते १०.३० पर्यत आगरी कोळी महोत्सव पाहण्यासाठी येत आहेत. आगरी-कोळी संस्कृतीची माहिती, चालीरिती नवी मुंबईकरांना माहिती व्हावी याकरता सिडकोचे माजी संचालक व शिवसेना नगरसेवक नामदेव भगत हे अखिल आगरी-कोळी समाजप्रबोधन ट्रस्टच्यावतीने गेल्या काही वर्षापासून आगरी-कोळी महोत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यात येत आहे.
या महोत्सवात एकवीरा आईचे मंदीर, पुरातन आगरी-कोळी संस्कृती दर्शविणारे घर, भांडी-कुंडी, शेतीची अवजारे, गाई, बैलगाडी आदींचे दर्शन आपणास पहावयास मिळते. दररोज लोकसंस्कृतीपर विविध मनोरंजनपर कार्यक्रमांचे सादरीकरण होत आहे. खवय्यांकरता शाकाहारी व मासांहारी दोन्ही प्रकारचे भरपूर स्टॉल उपलब्ध आहेत. बच्चेकंपनीला खेळण्याकरीता विविध प्रकार उपलब्ध आहेत.
या महोत्सवामध्ये दररोज ठाणे, नवी मुंबई, रायगड, पनवेल-उरण, मुंबई भागातून शिवसेनेचे नगरसेवक, पदाधिकारी, शिववाहतूक सेनेचे पदाधिकारी भेट देत आहेत. ८ जानेवारीला हा महोत्सव सुरू झाला असून १७ जानेवारीपर्यत हा महोत्सव चालणार आहे.