नवी मुंबई: विद्युत डीपीमधील केबलच्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागण्याची घटना नेरूळ सेक्टर सहामधील प्लॉट १५वरील सिडकोच्या शिवम सोसायटीत घडली. सोसायटीतील रहीवाशांनी वेळीच रेती टाकून आग विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास सोसायटीतील बी-४, ए विंग मधील तळमजल्यावर राहणारे तेजस मुनवर व पहिल्या मजल्यावरील शर्मा यांना धुराचा वास येवू लागल्याने त्यांनी शोध घेतला असता डीपीमधून धुर येत असल्याचे निदर्शनास आले. अवघ्या काही सेंकदातच डीपीतून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या. रहीवाशांनी अग्निशमन व एमएसईडीसी संपर्क साधला असता, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. रहीवाशांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या स्थानिक नगरसेविका सुजाता पाटील, शिवसेनेचे शिववाहतुक सेनेचे बेलापुर विधानसभा अध्यक्ष दिलीप आमले आणि राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांच्याशी संपर्क साधून अग्निशमन व एमएसईडीसीच्या कर्मचार्यांना तात्काळ पाठविण्याच्या सूचना केल्या.
अग्निशमन व एमएसईडीसी कार्यालयातून प्रतिसाद मिळत नसल्याचे पाहून सोसायटीतील रहीवाशांनी रेती आणून आगीवर टाकण्यास सुरूवात केली. रेतीचा मारा झाल्याने आग विझली. रेती टाकली गेली नसती तर अवघ्या दहा ते बारा मिनिटात मोठी दुर्घटना होण्याची भीती होती.
एकीकडे आग विझविण्याचे प्रयास सुरु असताना दुसरीकडे दिलीप आमले यांनी नेरूळ पोलीस ठाण्यात संपर्क करून अग्निशमन संपर्क होत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी अग्निशमनला सूचना केल्या. नगरसेविका सुजाता पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष सुरज पाटील यांनी अग्निशमन व एमएसईडीसीच्या कर्मचार्यांना घटनास्थळी पाठविले. नेरूळ पोलिस, अग्निशमनचे वाहन व एमएसईडीसीचे कर्मचारी शिवम सोसायटीत आले, तोपर्यत आग विझलेली होती. पोलीस, अग्निशमन व एमएसईडीसीच्या कर्माचार्यांनी विद्युत डीपीची पाहणी केली. रेतीमुळे आग विझली तरी धुर येतच होता. डीपीमध्ये रेतीच रेती पहावयास मिळाली.