नवी मुंबई : ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’ या म्हणीची प्रचिती दिघ्यातील एमआयडीसी परिसरालगतच्या झोपड्यांना आला असणार. दिघा परिसरात एमआयडीसी मालकीच्या जमिनीवर असणार्या अनधिकृत झोपड्या व ईमारतींवर अतिक्रमणाचा हातोडा चालविला जात असतानाच १९९५ पूर्वीच्या पात्र व वैध झोपड्याही तोडण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे अतिक्रमणाची कारवाई सुरू असताना या पात्र व वैध झोपडपट्टी रहीवाशांनी कागदपत्रे दाखवूनही एमआयडीसीने त्यांना बेघर करण्यात काहीही कसर न ठेवल्याचे स्पष्ट झाले आहे.
दिघा कार्यक्षेत्रातील यादवनगर परिसरातील २५०० अधिक झोपड्यांवर कारवाई करणार्या एमआयडीसी आण पोलीसांच्या भूमिकेविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एमआयडीसीने कारवाई करताना दिघा व्यतिरिक्त दुसर्या विभागातील २० वर्षे जुन्या वैध झोपड्यांवरही हातोडा चालविला आहे. यादवनगरातील २० वर्षे जुन्या किमान ३ हजार वैध झोपड्यांना याची झळ बसली आहे. आश्चयार्र्ची बाब म्हणजे अतिक्रमण कारवाईच्या वेळी पात्र व वैध झोपड्यातील रहीवासी आपली कागदपत्रे दाखवितानाही त्यांच्यावर उपस्थित पोलीसांच्या मदतीने लाठीमार करण्यात आला. १९९५ पूर्वीच्या झोपड्यांना अधिकृत ठरवित त्या झोपड्या पात्र असल्याविषयीची कागदपत्रेही प्रशासनाकडून झोपड्यांना देण्यात आली आहेत. तथापि पात्र व वैध झोपड्यांची कागदपत्रे दाखवून एमआयडीसीने जाणिवपूर्वक आम्हाला बेघर केले असल्याचा आरोप या झोपडपट्टीधारकांकडून केला जात आहे.
२१ जानेवारीला कारवाई करताना अनधिकृत झोपड्यांसोबत अधिकृत झोपड्यांवरही कारवाई केली आहे. कागदपत्रे दाखविणार्या झोपड्यातील महिला व पुरूषांनाही पोलीसांनी मारहाण केली आहे. या झोपडपट्टीधारकांकडे
महापालिकेच्या सर्व्हे पावत्याही आहेत. राधेशाम देवकी मौर्या (३७७७४),अशोक भुलन यादव (३८५०६), दिनेश कुमार यादव (३७७२७), रघुराम बद्रीप्रसाद यादव (४२४०३), उदयराज विश्वकर्मा (३८५११), जगदीश ब्रम्हदेव राजभर (३७७५९) यासह अनेक पात्र व वैध झोपडपट्टीधारकांवर एमआयडीसी व पोलीसांनी कारवाई केली आहे. आपल्या अधिकृत झोपड्यांवर एमआयडीसीचा बुलडोझर चालविला गेल्याने या झोपडपट्टीधारकांचे संसार आता उघड्यावर पडले आहेत. न्यायाच्या प्रतिक्षेत आता या झोपडपट्टीधारकांनी आता राजकारण्यांच्या उंबरठ्यावर चपले झिजविण्यास सुरूवात केली आहे.