नवी मुंबई : गेल्या एक वर्षापासून शिवसेनेच्या नवी मुंबई जिल्हाप्रमुख पद रिक्त आहे. या पदासाठी अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून असले तरी मातोश्रीकडून जिल्हाप्रमुखपदासाठी हालचालीच होत नसल्याने इच्छूकांच्या महत्वाकांक्षेला लगाम बसला आहे. महिला जिल्हा संघठकही बदली होणार असल्याची शिवसेना वर्तुळात चर्चा सुरू आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीच्या अगोदर विजय चौगुले यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला. महापालिका निवडणूका शिवसेना जिल्हाप्रमुखाविनाच लढली. शिवसेना खासदार राजन विचारे, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, उपनेते विजय नाहटा यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविण्यात आली. ३८ नगरसेवक निवडून आले. जिल्हाप्रमुख पदासाठी ऍड. मनोहर गायखे, विठ्ठल मोरे, नामदेव भगत, विजय माने, एम.के.मढवी, किशोर पाटकर, मनोज हळदणकर अशी डझनभर नावे चर्चेत असली तरी मातोश्रीवरून वर्षभराच्या कालावधीत शिवसेना जिल्हाप्रमुख पदाविषयी कोणत्याही हालचाली होत नसल्याने इच्छूकांना अजून काही काळ आपले देव पाण्यातच ठेवावे लागणार आहे.
शिवसेना महिला जिल्हा संघठक पदावरही नवीन नियुक्ती होणार असल्याची चर्चा जोर धरत असून जिल्हा संघठक रंजना शिंत्रे यांच्याजागी माजी विरोधी पक्षनेत्या सरोज पाटील यांची वर्णी लागण्याची शक्यता शिवसैनिकांकडून व्यक्त केली जात आहे. जिल्हाप्रमुखपदासाठी एम.के.मढवी व किशोर पाटकर हे प्रबळ दावेदार मानले जात असून दोघेही कट्टर गणेश नाईक विरोधक आहेत. नुकत्याच झालेल्या मनपा पोटनिवडणूकीत भाजपा उमेदवाराच्या पराभवाचे खापर भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी शिवसेना पदाधिकार्यांवर फोडले होते. पोटनिवडणूकीत शिवसेना पदाधिकार्यांनी सहकार्य केले नसल्याचा आरोप आ. मंदा म्हात्रे यांनी केला आहे. जिल्हाप्रमुखच नसल्याने सर्वच नेते असल्याच्या थाटात वावरत असून संघटनेत मनमानी कारभार सुरू असल्याचे लवकरात लवकर जिल्हाप्रमुख नेमण्याची मागणी शिवसैनिकांकडून केली जात आहे.