मनपाच्या माता बाल रूग्णालयातील नवीन लिफ्ट प्रकरण
नवी मुंबई : बांधकाम अवस्था धोकादायक असलेल्या मनपाच्या तुर्भेतील माता बाल रूग्णालयात बसविण्यात आलेली नवीन लिफ्ट (उद्वाहन) प्रकरणी महापालिकेने नवी मुंबईकरांच्या केलेल्या पैशाचा अपव्यय असल्याचे सांगत कामगार नेते व कॉंग्रेस पक्षाचे रोजगार व स्वंयरोजगार अध्यक्ष रविंद्र सावंत यांनी लोकायुक्तांकडेच तक्रार दाखल केल्याने मनपाच्या अधिकार्यांना आता मुर्ंबइत मंत्रालयासमोरील लोकायुक्तांच्या दालनात चपला झिजविण्याची पाळी आली आहे. हे प्रकरण राव यांच्यावर शेकण्याची शक्यता असून त्यांच्याकडूनच उद्वाहनाचा खर्च वसूल होण्याची कुजबुज महापालिका मुख्यालयात सुरू आहे.
महापालिकेच्या तुर्भेतील माता बाल रूग्णालयाची ईमारत मोडकळीस आल्याने धोकादायक स्थितीत आहे. तसा अहवालही स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये आहे. या माता बाल रूग्णालयाचे संरचनात्मक परिक्षण (स्ट्रक्चरल ऑडिट) १ ऑगस्ट २०१४ ते ५ ऑगस्ट २०१४ या कालावधीत करण्यात आले होते. या परिक्षणाचा अहवाल ११ ऑगस्ट २०१४ रोजी सादर करण्यात आला असता ही रूग्णालयाची ईमारत अंत्यत दयनीय व मोडकळीस आली असल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले. ऑगस्ट महिन्यात धोकादायक ईमारतीचा अहवाल येवूनही सप्टेंबर महिन्यात उद्वाहन (लिफ्ट) बसविले जाते याचाच अर्थ संबंधित खात्याचे उपायुक्त राव हे मनमानी कारभार करत असून त्यांच्या लहरी स्वभावामुळे पालिका प्रशासनाला वेठीस धरले जात आहे व करदात्या नवी मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी होत असल्याचे उद्ववाहन (लिफ्ट)प्रकरणात पहावयास मिळाले असल्याचे रविंद्र सावंत यांनी म्हटले आहे.
या रुग्णालयात उपचार करणे म्हणजे आजारी असलेल्या रूग्णांना उपचाराकरता मृत्यूच्या दारात वावरण्यासारखे असल्याचे सांगत हे रूग्णालय बंद करण्याची मागणी रविंद्र सावंत सातत्याने मनपा प्रशासनाकडे करत आहेत. धोकादायक अवस्थेत असलेल्या व मोडकळीस आलेल्या रूग्णालयाची डागडूजी न करता पालिका प्रशासनाने सप्टेंबर २०१४ मध्ये २२ लाख ८५ हजार रूपये खर्च करत नवीन लिफ्ट (उद्वाहन) बसविली. मोडकळीस आलेल्या या ईमारतीमध्ये जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचारी व अधिकारी सुविधा देत आहेत. त्या ईमारतीच्या डागडूजीवर निधी खर्च न करता मनपा प्रशासनाने याच ठिकाणी नवीन लिफ्ट (उद्वाहन)वर हा केलेला खर्च अनाठायी असल्याचे सांगत संबंधित खर्च या निर्णय प्रक्रियेत मनपा अधिकार्यांकडून वसूल करण्यासाठी रविंद्र सावंत मनपा आयुक्तांकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे.
धोकादायक व मोडकळीस आलेल्या रूग्णालयीन ईमारतीमध्ये नवीन लिफ्ट (उद्वाहन)वर झालेला लाखो रूपये खर्च हा करदात्या नवी मुंबईकरांच्या पैशाची उधळपट्टी असल्याचे सांगत महापालिका प्रशासनाच्या मनमानी कारभाराला कोठेतेरी पायबंद बसावा याकरता पाठपुरावा करणार्या रविंद्र सावंतांच्या लेखी पाठपुराव्याला मनपा प्रशासन दाद देत नसल्याने अखेरीला सावंत यांनी महाराष्ट्र शासनाच्या लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सुनावणीस प्रारंभ झाला असून महापालिका अधिकार्यांना आता लोकायुक्तांच्या दालनाचे उंबरठे झिजविण्यास सुरूवात केली आहे.
धोकादायक असणार्या व तसा स्पष्टपणे अहवालात नमूद केलेले असताना उपायुक्त राव यांनी उद्वाहन (लिफ्ट) बसविण्याची घाई का केली हा सर्व प्रकार संशयास्पद असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी रविंद्र सावंत यांना संपर्क केला असता, चुकीच्या ठिकाणी जोपर्यत करदात्या नवी मुंबईकरांचा खर्च झालेला पैसा संबंधितांकडून वसूल होत नाही, तोपर्यत आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकायुक्तांकडून आपल्याला न्याय मिळणारच असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला.