इमारतीला १९ कोटी अधिक खर्च
मुंबई : राज्यकर्ते आणि सरकारी कर्मचारी आपल्या सुख सुविधांसाठी कोट्यवधी रुपयांचा चुराडा कसा करतात हे पुन्हा एकदा उघड झाले आहे. बीकेसी येथील एमएमआरडीएच्या ‘आयकॉनिक’ इमारतीचे काम गेली ९७ महिने रडतखडत चालले होते. या नवीन इमारतीसाठी मूळ ८७ कोटींची तरतूद असताना त्यावर १०६ कोटींचा खर्च झाल्याचे समोर आले आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी ही माहिती उघड केली आहे. त्यांना मिळालेल्या माहितीनुसार, या इमारतीचे काम २४ जानेवारी २००७ रोजी मंजूर झाले होते. ते ३१ डिसेंबर २०१२ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र यासाठी तीन वेळा मुदत वाढ दिली. त्यामुळे मूळ रकमेत १९ कोटी रुपयांची वाढ झाली. काम प्रलंबित होण्यासाठी मूळ नकाशात आणि कामात बदल करणे तसेच वेगवेगळ्या यंत्रणेची एनओसी मिळणे अशी कारणे सांगितली आहेत. कासवगतीने पूर्ण झालेल्या या इमारतीच्या कामाचा अधिकचा १९ कोटी रुपयांचा खर्च एमएमआरडीएच्या तिजोरीवर पडला आहे. या इमारतीचे उद्धाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
इमारतीचे बांधकाम मेसर्स रेलकॉन इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड, अंतर्गत सजावटीची कामे मेसर्स गोदरेज कंपनी लिमिटेड तसेच विद्युत व वातानुकुलित यंत्रणा संबंधित कामे मेसर्स प्रविण इलेक्ट्रिकल्स लिमिटेड या कंपन्या करत आहेत. ९ मजले व २ सर्व्हिस मजले अशी ११ माळ्यांची इमारत आहे.