ठाणे : एक मोबाईल विक्रेता दिवसभर जमा झालेली रक्कम मोजत होता. त्यावेळी अचानक दुकानात घुसलेल्या दोन जणांनी त्याला मुसक्या बांधून त्याच्याकडील ६ लाख ८० हजार रुपयांची रक्कम लुटून नेली आहे. या घटनेमुळे परिसरातील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
अशोक केशवदास रोहिडा (वय ५१) असे या व्यापार्याचे नाव आहे. त्यांचे झुंझारराव मार्केटमध्ये भारत एजन्सी नावाचे मोबाईलचे दुकान आहे. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास रोहिडा रक्कम मोजून केबिन बंद करत होते. घरी जाण्याच्या तयारीत असतानाच अचानक दोन जण दुकानात घुसले. शटर खाली ओढून लुटारूंनी दोरी आणि सेलो टेपचा वापर करत त्यांना जखडून ठेवले. त्यांच्याकडील ६ लाख ८० हजारांची रोकडेची सॅग घेऊन लुटारुंनी पळ काढला.
लुटारूंनी रोहिडा यांना खुर्चीत जखडून ठेवले होते. त्यावेळी त्यांनी १०० क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कधीही उपयोगी पडणारा हा क्रमांक यावेळीही कामी आला नाही. त्यामुळे त्यांनी सदर सोसायटीचे चेअरमन संजय निरगुडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तोही असफल ठरला. अखेर तशाच परिस्थितीत ते खुर्चीसह बाहेर आले. त्यांची आवस्था पाहून शेजारील रुग्णालयातील लोकांनी त्यांना मदत केली. रोहिडा यांच्या जबानीवरून महात्मा फुले चौक पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन गुन्हा दाखल केला.
कल्याण-डोंबिवलीत चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दिवसाढवळ्या गर्दीच्या ठिकाणी ऐवज लंपास करण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या गुन्ह्यांना आळा घलण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरत असल्याचे चित्र आहे.