ठाणे : मुंबईच्या दिशेने येणार्या धावत्या गीतांजली एक्सप्रेसमध्ये रविवारी संध्याकाळी जोरदार बिअर वॉर झाले. गुटका विकणार्या फेरीवाल्याच्या पायाला प्रवाशाचा धक्का लागल्याने गुटखा विक्रेत्या 10 ते 12 जणांच्या टोळक्याने केलेल्या बिअर बाटल्यांच्या हल्ल्यात 3 प्रवासी जबर जखमी झाले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कुर्ल्याच्या कोहिनूर नगर परिसरात राहणारे सुनील भाटे ( वय 56 ) आणि दिनेश भाटे ( वय 41 ) हे जळगाववरून गीतांजली एक्सप्रेसने कुर्ला येथे येण्यासाठी प्रवास करीत होते.
सायंकाळच्या सुमारास गीतांजली एक्सप्रेस कसारा येथे येताच एक फेरीवाला गुटखा विक्रीसाठी जनरल बोगीमध्ये शिरला. या दरम्यान सुनील भाटे यांच्या पायाचा धक्का त्या फेरीवाल्याला लागला. यातून वाद विवाद होवून गुटका विकणार्या युवकाने त्याच्या 10 ते 12 साथीदारांना बोलवून सुनीलच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून गंभीर जखमी केले.
दिनेश यांच्यासह बिअरच्या फुटक्या बाटलीच्या काचेने या दोन रेल्वे प्रवाशांवर सपासप वार करून या टोळक्याने धूम ठोकली. जखमींना कल्याणच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास रेल्वे पोलीस करीत आहे.