ठाणे : मुंबईच्या देवनार येथील डम्पिंग ग्राउंडला आग लागल्याने निर्माण झालेल्या धुरामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर आता कल्याणच्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. कल्याणमध्ये गेल्या वर्षभरापासून अशाप्रकारे आग लागत असून निर्माण होणार्या धुरामुळे नागरिक त्रस्त आहेत. याप्रकरणी गेली अनेक महिन्यापासून कारवाईची मागणी केली जात असली तरी प्रशासन यातून नागरिकांची सुटका कशी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
मुंबई येथील देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर शनिवारी सकाळच्या सुमारास आग लागली. या आगीमुळे निर्माण झालेल्या धुराने संपूर्ण परिसर जणू गिळंकृत केला होता. मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन यंत्रणेची एकच धावपळ उडाली असून मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. तर कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत वादग्रस्त ठरलेल्या आधारवाडी डम्पिंग ग्राउंडवरही गेल्या अनेक महिन्यांपासून आग लागत आहे. या आगीमुळे निर्माण होणार्या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. हा धूर संपूर्ण परिसरात पसरत असल्याने या परिसरात नागरिकांना नाक मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. याबाबत अनेकदा आंदोलने, पत्रव्यवहार करूनही पाण्याचे बंब पाठवून तात्पुरती कारवाई करण्यात येते. मात्र, वारंवार घडणार्या आग लागण्याच्या घटनामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या बाबत सुरुवातीला प्रशासनाकडून मिथेल वायुमुळे आग लागत असावी असा तर्क लावण्यात येत होता. तसेच आग लावून नागरिकांच्या जीवाशी खेळणार्या इसामांविरोधात गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी महापालिकेने बाजारपेठ पोलिसांकडे केली होती. मात्र, त्यानंतरही आग लागण्याच्या घटना घडत असून नागरिक त्रस्त झाले आहेत. याबाबत कर्तव्यदक्ष पालिका प्रशासनाने कारवाई करत आमची सुटका करावी, अशी मागणी धुराने त्रस्त झालेल्या नागरिकांनी केली आहे.