कल्याण : भावकीच्या जमीन वादातून एका तरुणावर प्राणघातक हल्ला करण्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. या प्रकरणी जखमी तरुणाने भाजपचे कल्याण पश्चिम शहर अध्यक्ष अर्जुन म्हात्रे यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले असले तरी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.
कल्याण पश्चिमेत गौरीपाडा येथे राहणारा तुषार वसंत म्हात्रे (३०) याने ही फिर्याद खडकपाडा पोलिसांना दिली आहे. एकाच भागात राहणार्या म्हात्रे भावकीत जागा-जमिनीचा वाद सुरू आहे. या वादाला शुक्रवारी सकाळी तोंड फुटले. तक्रारदार तुषार म्हात्रे याच्या जबानीनुसार गुरूवारी जमिनीवरून भांडण झाले होते. त्याचीच परिणती हाणामारीत झाली. घरातून भिवंडी येथे काही कामानिमित्त जाण्यासाठी निघालो असता आपणास मधुकर, अर्जुन आणि सुभाष म्हात्रे या आपल्या चुलत भावांनी अडविले. शाब्दिक बाचाबाची नंतर या तिन्ही भावांनी आपल्यावर लोखंडी सळी आणि दांडक्याने झोडपून काढले. या हल्ल्यात तुषारच्या डोके, पाठ आणि उजव्या हातास जबर दुखापत झाली.
या तरुणावर पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार केल्यानंतर घरी सोडण्यात आले. तर मधुकर विष्णु म्हात्रे (४७) यांच्याही जबानीनुसार तुषार आणि त्याचे वडील वसंत म्हात्रे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. तक्रारदार मधुकर म्हात्रे यांच्या फिर्यादीनुसार नमूद वेळी आणि ठिकाणी चुलत भाऊ वसंत आणि त्यांचा मुलगा तुषार हे दोघे घरात घुसले. त्यांनी जमिनीच्या क्षुल्लक वादातून आपणास ठोसा-बुक्क्याने मारहाण केली, असा आरोप मधुकर म्हात्रे यांनी त्यांच्या फिर्यादीत केला आहे.