ठाणे : उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवली परिसरात घरफोड्या करून नागरिकांमध्ये दहशत माजविणार्या एका सराईत गुन्हेगारास ठाणे गुन्हे शाखेच्या उल्हासनगर युनिटकडून नाट्यमयरीत्या अटक करण्यात आली. मुन्ना उर्फ कुर्बान सय्यद असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून जवळपास 954 ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले असून त्याच्या टोळीतील अन्य साथीदारांचा शोध गुन्हे शाखा घेत आहे.
गेली चार वर्षे उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि डोंबिवली परिसरात घरफोड्या करणार्या एका टोळीने अक्षरशः उच्छाद मांडला होता. आरोपी अत्यंत हुशार असल्याने पोलिसांच्या तावडीत मिळत नव्हते.
पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अंबरनाथ येथील उल्हास नदीच्या किनारी असलेल्या झाडाझुडपात लपलेल्या मुन्ना उर्फ कुर्बान सय्यद या 40 वर्षीय अट्टल गुन्हेगारास घेरले. आपण पकडले जाणार हे पाहून त्याने सरळ बाजूने वाहत असलेल्या उल्हास नदीत उडी घेतली.
त्याच्या पाठोपाठ पोलीस पथकातील काही कर्मचार्यांनी देखील नदीत उडी मारून त्याचा पाठलाग करुन त्याला जेरबंद केले. त्याच्या कडून 954 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले. तो आपल्या साथोदारांसह घरफोड्या करून मौल्यवान वस्तू चिकमंगळूर कर्नाटक येथे विकत अथवा गहाण ठेवत असे अशी माहिती पोलिसांनी दिली.
या टोळीवर एकूण 54 गुन्ह्यांची नोंद झाली असून कुर्बान वर 15 गुन्हे दाखल असून त्याला 4 फेब्रु पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे असल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.