नवी मुंबई ः ‘दिवंगत सरपंच दगडू चाहू पाटील सामाजिक पाटील संस्था, घणसोली’ तर्फे ३ ते ७ फेब्रुवारी २०१६ या दरम्यान घणसोली गावातील बाळाजी आंबो पाटील नवी मुंबई महापालिका शाळेसमोरील मैदानात ‘घणसोली महोत्सव-२०१६’ आयोजित करण्यात आला आहे. उद्या ३ फेब्रुवारी रोजी घणसोली घणसोली महोत्सवाला सुरुवात होत असून, या शानदार महोत्सवाचे उद्घाटन राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज (बंटी) पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सर्व धर्मियांच्या घणसोली महोत्सव उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ‘नवी मुंबई’चे महापौर सुधाकर सोनवणे, उपमहापौर अविनाश लाड, भिवंडी शहराचे महापौर तुषार चौधरी, नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष दशरथ भगत, माजी उपमहापौर अनिल कौशिक, रमाकांत म्हात्रे, युवक कॉंग्रेस नेते निशांत भगत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
उद्या ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता घणसोली महोत्सवाचा शुभारंभ घणसोली गावातील सर्वधर्मीय रुढी परंपरा संस्कृतीचे दर्शन घडविणार्या भव्य दिंडी मिरवणुकीने करण्यात येणार आहे. या मिरवणुकीत सर्व धर्मीय वारकरी, कीर्तन, भजन, ढोल, ताशे, लेझीम, शाळा-महाविद्यालयातील स्काऊट आणि गाईड पथक यांचा समावेश असणार आहे. ३ ते ७ फेब्रुवारी रोजी दरम्यान होणार्या पाच दिवसीय घणसोली महोत्सवमध्ये सायंकाळी ६ ते १० या वेळेत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून, घणसोली महोत्सव यशस्वी करण्यासाठी ‘दिवंगत सरपंच दगडू चाहू पाटील सामाजिक संस्था’चे संस्थापक-अध्यक्ष दीपक दगडू पाटील, कार्याध्यक्ष अभिषेक पाटील, माजी नगरसेविका सौ. शोभाताई दीपक पाटील आदी मान्यवर विशेष मेहनत घेत आहेत.
७ फेब्रुवारी रोजी घणसोली महोत्सवाचा शानदार समारोप सोहळा होणार असून, त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता महिलांसाठी हळदीकुंकू आणि होम मिनिस्टर खेळ होणार आहे. त्यानंतर पत्रकार अनंत पाटील, दंत चिकित्सक डॉ. सायली रानकर, आगरी साहित्यिक भानुदास पाटील, महापालिका शिक्षक प्रकाश मढवी आणि सुप्रसिद्ध इंटेरियर डेकोरेटर्स तथा फोर्टी प्लसचे कॅप्टन विशाल मढवी यांना माजी पालकमंत्री गणेश नाईक, माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक यांच्या हस्ते ‘घणसोली पंचरत्न पुरस्कार’ प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार आहे.
‘साई तुझ्या मानाची, मानाची ही पालुखी, पालखी घणसोलीच्या ओम साई मंडळाची….’ या आगरी बप्पी लाहिरी आणि सुप्रसिद्ध गायक संतोष चौधरी उर्फ दादुस यांनी लिहिलेल्या तसेच आपल्या सुमधुर आवाजात गायलेल्या भक्तीगीताने आज व्हीसीडी आणि डीव्हीडी यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातील रसिकांना भुरळ घातली आहे. नवी मुंबई, ठाणे, रायगड, मुंबई, कोकण पट्टीतील आदर्श कलावंतांमध्ये दादुस यांचे नाव प्रत्येक आगरी-कोळी महोत्सवात प्रामुख्याने घेतले जाते.
यावर्षी या दादुस यांचे ‘घणसोली महोत्सव’ मध्ये फार मोठे योगदान लाभणार आहे. शाहीर सदानंद पाटील, आगरी कवी भानुदास पाटील, संजय रानकर, नरेश पाटील, मनोज भोईर, विघ्नेश मढवी, किरीट बाळू मढवी, रामनाथ म्हात्रे, विकास रानकर, प्रल्हाद भोईर, गणेश म्हात्रे, मृदंगमनी आणि प्रसिद्ध ढोलकीवादक नरेशबुवा पाटील, मोहन मढवी (मास्तर) यांची व्यवस्थापन कमिटी ‘घणसोली महोत्सव’चे व्यवस्थापन करणार आहे.