शरद पवारांची भाजपवर टीका
मुंबई : मी अनेक वर्षे राज्यात, केंद्रात काम केले आहे. मात्र, प्रथम सत्तेचा अतिशय वेगळ्या व चुकीच्या पद्धतीने वापर केला जात आहे. एकाच तक्रारीची तीन-तीन एजन्सी अनेक वेळा कशी काय चौकशी करतात असा प्रश्न मला पडतो. सत्तेचा गैरवापर करून छगन भुजबळ व त्यांच्या कुटुंबियांना टार्गेट केले जात आहे अशी भूमिका राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी आज मुंबईत मांडली. राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या विविध ९ मालमत्तांवर सोमवारी ईडीने छापे टाकले होते. तसेच त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांना सोमवारी रात्री उशिरा अटक केली होती.
छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या चौकशीचे फास ईडीने पुन्हा एकदा आवळण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून प्रथम जून महिन्यात ईडी व एसीबीने छापे टाकल्यानंतर काल सोमवारी पुन्हा एकदा ईडीने छापे टाकले. तसेच भुजबळ यांचा मुलगा पंकज व समीर यांची उलटतपासणी केली. या तपासणीनंतर माजी खासदार समीर भुजबळ यांना ईडीने अटक केली. याचे पडसाद उमटले. राजकीय सूडबुद्धीने ही कारवाई केली जात असून भुजबळांना टार्गेट केले जात आहे अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली. यानंतर आज दुपारी पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप सरकारच्या व त्यांच्या नेत्यांच्या भूमिकेवर सडकून टीका केली. पवारांचा रोख अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार किरीट सोमय्या यांच्यावर होता.
शरद पवार म्हणाले, मी राज्यात, केंद्रात अनेक वर्षे काम केले. एखादा निर्णय मंत्रिमंडळाने किंवा ग्रुप ऑफ मिनिस्टर्स यांनी घेतला की त्याबाबत कधीही शंका व्यक्त केली जात नाही असा संकेत आहे. कारण असे निर्णय सामूहिकरित्या व व्यापक हित लक्षात घेऊन घेतले जातात. भुजबळ यांनीही महाराष्ट्र सदन प्रकरणात वैयक्तिक एकही निर्णय घेतलेला नाही. सर्व निर्णय कॅबिनेटने घेतले आहेत. अशा स्थितीत भुजबळांना दोषी कसे ठरवता येईल. मात्र, ज्या नेत्यांनी ही तक्रार केली तो नेता संसदेत आहे. या नेत्याच्या विचाराचे व पक्षाचे सरकार केंद्रासह राज्यात सत्तेवर आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळा वास येत असल्याचे लक्षात येते. सत्तेचा एवढा दुरुपयोग आपण यापूर्वी कधीही पाहिला नाही. भुजबळांना व त्यांच्या कुटुंबियांना लक्ष्य केले जात आहे. मात्र, ते निर्दोष आहेत. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. मात्र, तपास यंत्रणांना संबंधितांनी तपासात सहकार्य करावे असे पवारांनी भुजबळ कुटुंबियांना आवाहन केले.
****
आणखी वाचा पवार काय-काय म्हणाले?
* कॉंग्रेस-राष्ट्रवादीशिवाय अनेक सरकार पाहिली, पण सत्तेचा गैरवापर करणारं भाजप सरकार प्रथमच असे राजकीय हेतूने काम करीत असल्याचे पाहात आहे. यापूर्वी मनोहर जोशी, नारायणे राणेंचंही सरकार पाहिलं पण असे होताना दिसले नाही.
* आमचा तपासयंत्रणा व न्याय व्यवस्थेवर विश्वास, त्यांना सहकार्य करणार
* सरकारच्या विरोधात याप्रकरणी आंदोलन करणार नाही. यापेक्षा दुष्काळ व त्यापेक्षाही गंभीर गोष्टी राज्यात घडत आहे. तिकडे आम्ही लक्ष देऊ.
* सत्तेचा दुरुपयोग करून राजकीय खेळी खेळली जात आहे.
* शनिशिंगणापूरमध्ये स्त्री-पुरुष असा भेदभाव करू नये. हे मंदिर सर्वांना खुले करावे.