सिडको आणि पालिका अधिकार्यांसमवेत प्रलंबित विकासकामांचा पाहणीदौरा
नवी मुंबई : नवी मुंबईतील वाशी, कोपरखैरणे आणि ऐरोली परिसरात सिडको आणि महापालिकेच्या माध्यमातून नागरी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. घणसोली नोडमधील पायाभूत आणि नागरी सुविधांसाठी सिडकोच्या माध्यमातून विकासनिधी मिळावा यासाठी महाराष्ट्राच्या राजकारणात नवी मुंबईचा ओबामा या नावाने ओळखले जाणारे आमदार संदीप नाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून सिडकोने येथे विकासनिधी देवून सुविधांची कामे सुरु केली आहेत. आ.नाईक यांनी आज(ता.२) सिडको, महापालिकेचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक यांच्या समवेत घणसोली नोडमधील प्रलंबित सोयीसुविधांचा आणि विकास कामांचा आढावा घेतला.
ऐरोली विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना नागरी सुविधा मिळाव्यात, त्यांच्या नागरी समस्यांचे निवारण व्हावे, रोजगार निर्मिती व्हावी, प्रकल्प उभे राहवेत याकरता आमदार संदीप नाईक सातत्याने प्रयत्नशील असून विधानसभा मतदारसंघाचा कानाकोपरा पायाखाली घालत असतात. मतदारसंघाचा अधिकांश भाग जनसंपर्कातून सतत भेटीगाठी, मतदारांशी सुसंवाद व सुसंवादातून समस्या-सुविधांची खातरजमा यामुळे गतकाही वर्षात खर्या अर्थांने जनताभिमुख युवा नेतृत्व म्हणून आ. संदीप नाईक ऐरोलीवासियांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत.
सिडकोने आरक्षित सुविधा भुखंड महापालिकेकडे हस्तांतरीत करावेत त्याचबरोबर सिडकोच्या अंतर्गत असणार्या घणसोली परिसराला नागरी सुविधा पुरविण्यासाठी आणि प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडविण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी सिडकोचे व्यवस्थापकीय-संचालक संजय भाटीया यांची पुन्हा भेट घेणार असल्याचे आ.नाईक यांनी यावेेळी सांगितले.
मागील काही वर्षामधील सर्व्हेनुसार घणसोली हा सर्वात मोठा नोड म्हणून गणला गेला आहे. घणसोली नोडमध्ये रस्ते, पदपथ, मलनि:स्सारण, विद्यृत रोषणाई आणि नागरी सुविधा सिडकोने नागरिकांना पुरवायच्या आहेत. त्या अनुषंगाने आ.नाईक यांनी सिडकोच्या अधिकार्यांसमवेत घणसोली एनएमएमटी बस डेपो रस्त्याची पाहणी केली. घणसोली ते पामबीच या मार्गाला शहराशी जोडण्याबरोबरच तेथे सुविधा देण्यासाठी सिडकोने केलेल्या विकास योजनांची माहिती अधिकार्यांकडून आ.नाईक यांनी जाणून घेतली. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे सिडकोकडील सुविधा भुखंड महापालिकेकडे हस्तांतरीत होण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. अशाच सुविधा भुखंडावर परिवहन सेवेने घणसोलीला जोडण्याच्या दृष्टीकोनातून घणसोली सेक्टर-१० येथे परिवहनचा बस डेपो उभारण्याचे काम प्रगती पथावर सुरु आहे.
घणसोली परिसरातील खाडीपट्टयालगत मोठया प्रमाणावर गृहनिर्माण प्रकल्प साकारत आहेत. या रहिवासी भागात अवजड वाहनांमुळे अंतर्गत रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. तर रस्त्यावर पथदिव्यांची पुरेशी सुविधा नसल्याने चेन स्नॅचिंगचे प्रकार होत असल्याने त्वरीत रस्त्याच्या दोन्ही बाजूला स्ट्रिट लाईट बसविण्याच्या सूचना आ.नाईक यांनी सिडको अधिकार्याांना दिल्या. या ठिकाणी पथदिवे बसवून देण्याचे सिडकोच्या अधिकार्यांनी मान्य केले. नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विशेषत: महिलांना हेाणारा त्रास दूर करण्यासाठी या ठिकाणी लवकरच पोलिस बीट चौकी उभारण्यासाठी प्रयत्न करु, असे आमदार नाईक यांनी सांगितले. घनसोली नोडमध्ये मलनि:स्सारणाची समस्या गंभीर असून त्याबाबत सिडकोने तातडीने उपाय योजना करण्याच्या सूचना देखील आ.नाईक यांनी दिल्या. गावठाणांच्या विकासासाठी सिडकोने आखलेेल्या योजना. त्याच सिडकोकडून विकास कामांसाठी भुखंड हस्तांतरण विषय, घणसोली ते पामबीच मार्गावरील सोयी सुविधा, त्याच बरोबर घणसोलीकरांसाठी सिडकोच्या विकास योजना जाणून घेण्यासाठी पुढील आठवडयात सिडकोचे अधिकारी आणि त्यानंतर महापालिकेचे अधिकारी यांच्या समवेत एक बैठक घेणार असल्याचे आ.नाईक यांनी संागितले.
या पाहणी दौर्याप्रसंगी महापालिकेच्या घणसोली प्रभागाचे वॉर्ड अधिकारी डॉ.गडदे, गुरव, सिडकोचे सहाय्यक लेखाधिकारी शमी, अधिकारी चव्हाण, म्हात्रे, सिव्हिल विभागाचे अधिकारी मोहिले उपस्थित होते.त्याच बरोबर नगरसेवक घनश्याम मढवी, परिवहन समितीचे माजी सभापती दिलिप म्हात्रे, माजी नगरसेवक संजय पाटील, माजी नगरसेवक बाळकृष्ण पाटील, ज्येष्ठ समाजसेवक पुरुषोत्तम पाटील, समाजसेवक भगवान सोलाट आदी मान्यवर उपस्थित होते.