आमदार संदीप नाईक यांचा विश्वास
नवी मुंबई : नवी मुंबईत ऐरोली खाडीकिनारी साकारणारे पानथळ केंद्र राज्यातील महत्वाचे खारफुटी पर्यटनकेंद्र ठरेल, असा विश्वास आमदार संदीप नाईक यांनी व्यक्त केला आहे.
वन विभागाअंतर्गत असलेल्या कांदळवण खात्याच्या वतीने आज ऐरोलीच्या दिवा जेटटी येथे जागतिक पानथळ दिन साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार नाईक बोलत होते.
वन खात्याचे सचिव विकास खर्गे, मुख्य वनसंरक्षक एन वासूदेवन यांच्यासह वने आणि कांदळवण खात्याचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, समाजसेवक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कांदळवण संरक्षणाचे काम वने आणि कांदळवण खाते उत्तम प्रकारे करीत असून केवळ जनजागृती नव्हे तर उपाययोजना देखील प्रभावीपणे करीत असल्याबददल आमदार नाईक यांनी या खात्याचे कौतुक केले. नवी मुंबईत विकसीत होत असलेले कांदळवण पर्यटन केंद्र राज्यात आकर्षणाचा विषय ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खाडीकिनार्यांचा विकास करताना स्थानिक स्वराज्य संस्थांसोबतच उद्योग, सामाजिक संस्था आणि इतर सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांनी गरज त्यांनी व्यक्त केली. नवी मुंबईला आव्हाने स्विकारण्यास आवडतात. पल्स पोलीओ मोहिम प्रभावीपणे राबवून पोलीओचे शहरातून उच्चाटन केले. नवी मुंबईत मुलींचा जन्मदर जास्त आहे हे यश नमूद करुन आता पर्यावरणाच्या दृष्टीने महत्वाचे प्लास्टीकमुक्त शहराचे स्वप्न साकार करुया असे आवाहन त्यांनी केले. श्री खर्गे यांनी आपल्या भाषणात राज्यामध्ये कांदळवणाचे क्षेत्र वाढत असून त्याचे महत्व जनतेला माहित करुन देण्याचे गरज विशद केली. या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्थ्यांनी पथनाटय सादर करुन कांदळवण संरक्षणाचा संदेश दिला.