मुंबई : सिंचन घोटाळ्याप्रकरणी महिनाअखेरपर्यंत सबंधित अधिकारी आरोपपत्र दाखल करतील, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली. त्यामुळे या प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार अणि माजी जलसंपदामंत्री सुनील तटकरे हे भाजपच्या रडारवर असल्याचे संकेतच महाजन यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचे पूतने माजी खासदार समीर भुजबळ यांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटक झाल्यानंतर आता सिंचन घोटाळ्याची चौकशी अंतिम टप्यात आल्याचे महाजन यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांच्यावर विरोधकांनी ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर तत्कालीन सरकारने या प्रकरणी चौकशीसाठी चितळे समिती नियुक्त केली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर याप्रकरणी ठपका ठेवता येणार नाही, असा अहवाल या समितीने दिला. त्यानंतर ७२ दिवसात अजित पवार पुन्हा पदावर आले.
दरम्यान आप नेत्या अंजली दमानिया यांनी रायगड जिल्ह्यातील कोंढाने प्रकल्पात गैरव्यवर झाल्याचा आरोप तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्यावर केला. यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. या यचिकेची सुनावणी सध्या न्यायालयात सुरू आहे. एकंदर सिंचन घोटाळ्याप्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करणार असल्याचे सांगत जलसंपदामंत्री महाजन यांनी अजित पवार अणि तटकरे यांना इशारा दिला आहे.