मुंबई : सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यांवर बंदी असताना भररस्त्यात पानाच्या पिचकार्या सोडणार्यांची संख्या मोठी आहे. अशा प्रकारे परिसर अस्वच्छ करणार्यांविरोधात आता थुंकणे प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नवा आराखडा तयार झाला असून यापुढे रस्त्यावर थुंकल्यास दंडात्मक कारवाईसह थुंकलेली जागा साफ करावी लागणार आहे.
मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांची समिती यासाठी गठीत करण्यात आली आहे. पुढील अधिवेशनात हा प्रस्ताव मांडून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात येईल, असे राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी म्हटले आहे.
‘जागतिक कर्करोग दिना’निमित्त गुरुवारी टाटा मेमोरिअल रुग्णालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. रस्त्यावर थुंकल्याने जागा अस्वच्छ होतेच पण त्यामुळे क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रसारही होतो.
झोपडपट्टी परिसरात संसर्गजन्य आजारांचा फैलाव होण्याची शक्यता अधिक असते. हे लक्षात घेऊन थुंकण्यावर बंदी घालण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यानंतरही अनेक ठिकाणी पान व तंबाखू खाऊन थुंकणे सुरूच आहे.
सरकारने रस्त्यावर थुंकणार्यांविरोधात दंडही आकारला. मात्र दंड भरल्यानंतर पुन्हा थुंकणे सुरूच राहते. हे पाहता यावर कसा प्रतिबंध घातला जाऊ शकतो, याकरिता सोशल नेटवर्किंग साईटवरून सर्वसामान्य नागरिकांच्या सूचना मागवण्यात आल्या होत्या. या नागरिकांना दिलेल्या प्रतिक्रियांत दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त थुंकलेली जागा साफ करण्याची शिक्षा करण्यात यावी.
जेणेकरून थुंकणा-याला लाजल्यासारखे होईल व पुढच्या वेळी ती व्यक्ती असे करणार नाही. या सूचनांचा विचार करून नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. याकरिता तीन मंत्र्यांची समितीही स्थापन करण्यात आली आहे. पुढील अधिवेशनात या संदर्भातील प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. रस्त्यावर थुंकणा-यावर संबंधित अधिका-यांच्या सूचनेवरून वाहतूक पोलीस, एखाद्या कंपनीचे संचालक कारवाई करतील.