कोल्हापूर : कर्नाटकातील मराठी भाषकांवर आधारित ‘मराठी टायगर्स’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यास चंदगड तालुक्यातील शिनोळी गावातील तहसिलदार आप्पासाहेब समिंदर यांनी विरोध केला आहे. तालुक्यात कन्नड लोकांची संख्या जास्त असल्याने चित्रपट प्रदर्शित झाला तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे कारण त्यांनी दिले आहे. दरम्यान येथील शिवसैनिकांनी कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित करणार असल्याचे सांगितले आहे.
* येळ्ळूरच्या घटनेवर आहे आधारित आहे चित्रपट
२५ जुलै २०१४ रोजी बेळगावातील येळ्ळूरमधील मराठी भाषकांवर पोलिसांनी अमानुष अत्याचार केले होते. त्यावर मराठी टायगर्स हा चित्रपट बेतलेला आहे. बेळगाव जिल्हा प्रशासनाने या चित्रपटावर बंदी घालण्याची धमकी गेल्या महिन्यात दिली होती. त्यानंतर वातावरण तापले होते. अमोल कोल्हे यात प्रमुख भूमिकेत आहे. बेळगावमधील सर्वसामान्य मराठी बांधवांनी या चित्रपटाला पाठिंबा दर्शवला आहे.
* कर्नाटक हायकोर्टाची परवानगी
कर्नाटक हायकोर्टाने मराठी टायगर्स या सिनेमाला परवानगी दिली आहे. या चित्रपटावर कर्नाटकात बंदी घालावी यासाठी एक कन्नड नेत्याने याचिका दाखल केली होती. पण न्यायालयाने ती फेटाळून लावली. चित्रपट प्रदर्शित होताना कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाने अत्यावश्यक पावले उचलावीत असेही न्यायालयाने म्हटले आहे.