मुंबई : देवनार कचरा डेपोला आग लागून 10 दिवस झाले आहेत. आग नियंत्रणात असली तरी मुंबईवर अजूनही धुराचे ढग कायम आहेत. यामुळे शिवाजीनगर गोवंडी परिसरातील रहिवाशांना श्वसनाचा त्रास होतच आहे. हा कचरा गेली अनेक वर्षे झाली येथे साठवलेला आहे. त्याची वेळीच विल्हेवाट लावली गेली नाही त्यामुळे या कचर्याच्या ढिगार्याखाली मिथेन वायु तयार झाला आहे. हा वायु ज्वलनशील आहे. ऑक्सीजनसोबत या वायुचा संपर्क झाला की लगेच पेट घेतो. त्यामुळे ही आग अजूनही राहून-राहून धगधगते आहे. आता उन्हाळा सुरू होत आहे. तापमानात वाढ झाल्यास हा धोका अजून वाढेल. यावर आयआयटी मुंबईने महापालिकेला एक कृती आराखडा सादर केला आहे. यात कचरा डेपोवरील मिथेन वायुपाईप लाईनद्वारे साठवून तो हवेत सोडण्यात येईल याची पाहणी करून अभ्यास करण्यात आला आहे. याकरिता सात लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. तसेच आयआयटीने मिथेन वायु विहिरीत साठवण्याची सूचना सुध्दा केली आहे. पण हा परिसर सुरक्षित नसल्याने धोका संभावतो अशी भीतीही पालिकेला आहे. पालिकेने लवकरात लवकर निर्णय घेऊन कचरा डेपो आणि आग प्रश्न मार्गी लावणे गरजेचे आहे नाही तर मुंबईत प्रदुषण वाढून त्यांचे आरोग्य धोक्यात येईल.