रेल्वे प्रशासनाला कधी येणार जाग ?
मुंबई – लोकलचा प्रवास आता दिवसेंदिवस जीवघेणा ठरत आहे. दररोज सरासरी दहाजण मृत्यूमुखी पडत असून १० जण जखमी होत असल्याचे चित्र दिसून येते. गुरूवारी दिवसभरात सेंट्रल, वेस्टर्न आणि हार्बर या तिन्ही लाईनवर मिळून एकूण १३ जणांचा मृत्यू झाला तर ९ जण जखमी झाल्याची माहिती जीआरपी पोलिसांनी दिली.
मुंबईतील लोकलच्या प्रवासामुळे मृत्यू पावणार्या प्रवाशांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेतल्याचे सध्यातरी दिसत नाही. एखादा रस्ते अपघात झाल्यास तातडीने कारवाई केली जाते. पण, गेल्या वर्षांनुवर्षे दरदिवशी रेल्वेच्या आपघातात दहापेक्षा अधिक जणांचा मृत्यू होत असतानाही याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. याउलट रेल्वे प्रशासन उडवाउडवीची उत्तरे देण्यासाठी नेहमीच पुढे असते.