* अडीच मिळणार की चार एफएसआय
* कामाला सुरूवात कधी होणार
सुजित शिंदे : 9619197444
नवी मुंबई : एफएसआयचे तुणतुणे गेली सात वर्षे नवी मुंबईत वाजत असून या वाद्याचे राजकीय वादक अडीच एफएसआयवरून आता चार एफएसआयवर जावून पोहोचले आहेत. गेल्या दहा वर्षापासून नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील राजकीय वर्तुळात एफएसआय हा विषय चर्चिला जात आहे. अडीच एफएसआयचा शासकीय अध्यादेश (जीआर) निघाला असतानाच भाजपाकडून पुन्हा चार एफएसआयच्या मागणीचे तुणतुणे सुरू झाल्याने आपणास नक्की कोणता एफएसआय मिळणार याबाबत नवी मुंबईकरांनाच संभ्रम पडला आहे. एफएसआय कोणताही मिळू द्या, पण किमान मोडकळीस आलेल्या व धोकादायक घोषित केलेल्या ईमारतींचा तरी सोक्षमोक्ष लावा अशी मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येत आहे.
ऑक्टोबर 2009च्या विधानसभा निवडणूकीत सर्वप्रथम एफएसआयचा विषय राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचाराचा मुद्दा बनला होता. सिडको ईमारतींना व साडेबारा टक्के भुखंडावरील ईमारतींना अडीच एफएसआय व गावठाण भागात चार एफएसआय मिळवून देण्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसच्या जाहिरनाम्यात नवी मुंबईकरांना देण्यात आले होते. त्यानंतर एप्रिल 2010 मध्ये झालेल्या नवी मुंबई महापालिकेच्या चौथ्या सार्वत्रिक निवडणूकीतही राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रचारात एफएसआय याच मुद्यांचे तुणतुणे प्रचाराकरता वाजविण्यात आले.
नवी मुंबई कार्यक्षेत्रात सिडकोच्या अधिकांश ईमारती ऐरोली ते बेलापुर या भागात आहेत. त्याखालोखाल साडे बारा टक्के भुखंडावर उभ्या राहीलेल्या ईमारती आहेत. गावठाण भागात गरजेपोटी निर्माण झालेल्या बांधकामातील ईमारतींचाही समावेश आहे. एमआयडीसी कार्यक्षेत्रातील शासकीय जमिनीवरही ईमारती उभ्या राहील्या आहेत.
अडीच एफएसआय व चार एफएसआय मिळणार या कल्पनेनेच शहरी व ग्रामीण भागातील नवी मुंबईकर खुश झाले. मात्र एफएसआय मिळण्यापूर्वी कोणत्या अटी घातल्या जाणार आहेत व काय निकष लावले जाणार आहेत याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवी मुंबईकरांसमोर काहीही स्पष्ट करण्यात आले नव्हते.
2009 ते 2014 या कालावधीत एफएसआयविषमी काहीही ठोस निर्णय लागला नाही. नवी मुंबई महापालिकेच्या महासभेत एफएसआयचा ठराव संमत करून मंजुरीसाठी मंत्रालयात पाठविण्यात आला. एफएसआय मंजूर झाल्यास याचे श्रेय राष्ट्रवादी काँग्रेसला मिळेल म्हणून काँग्रेसने एफएसआय विषयाला चालना दिली नाही. ऑक्टोबर 2014 विधानसभा निवडणूका जवळ आल्यावर पुन्हा मतदारांना सामोरे जाताना एफएसआयचे तुणतुणे पुन्हा वाजण्यास सुरूवात झाली. एफएसआय मंजूर झाला असून फक्त अध्यादेश (जीआर) काढावयाचा बाकी आहे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने एफएसआयचे श्रेय घेण्यास सुरूवात केली. विधानसभा निवडणूकीत सत्तापालट झाला. राज्यात भाजपा-सेनेचे सरकार सत्तेवर आला. बेलापुरातही गणेश नाईकांना पराभूत करून भाजपाच्या मंदा म्हात्रे विधानसभेत पोहोचल्या. राष्ट्रवादीच्या एफएसआय प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगत आ. मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई भाजपाच्या पुढाकारातून सादर केलेल्या एफएसआय प्रस्ताव राज्य शासनाकडून मंजूर झाला. एफएसआयचे श्रेय घेण्याचा प्रयास राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपाकडून करण्यात आला. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांत याबाबत फेसबुक व व्हॉट्सअप या सोशल मिडीयावर जुगलबंदीही झडली.
एफएसआयबाबत नवी मुंबईकरांना मार्गदर्शन झाल्यावर आपल्मा ईमारतींना सरसकट एफएसआय भेटणार नसल्याचे समजले. ईमारतीसमोरील रस्ता व अन्य तांत्रिक बाबींची तपासल्यावर एफएसआयचा निर्णय घेतला जाणार होता. धोकादायक व मोडकळीस आलेल्या ईमारतीमधील रहीवाशांनी व पदाधिकार्यांनी मंजुर झालेल्या एफएसआयच्या निकषावर बिल्डरांची शोधाशोध घेण्यास सुरूवात केली.
काही दिवसापूर्वीच भाजपा आ. मंदा म्हात्रे यांनी सिडको व खासगी ईमारतींना सरसकटपणे चार एफएसआय देण्याची मागणी राज्य शासनाकडे लेखी स्वरूपात करून या मागणीचा पाठपुरावा सुरू केला. अडीच एफएसआयवर वाशी सेक्टर 17 व सभोवतालच्या परिसरात बिल्डर आकर्षित झाल्याने नेरूळ व अन्य भागाकडे बिल्डरांनी पाठ फिरविल्याने नवी मुंबईकरांना सरसकटपणे एफएसआयचा लाभ मिळावा व कोठेही एफएसआयच्या लाभामध्ये विषमता राहू नये याकरता आ. मंदा म्हात्रे यांनी चार एफएसआयचा पाठपुरावा सुरू केल्याची माहिती भाजपाचे विजय घाटे यांनी दिली. चार एफएसआय संकल्पनेने नवी मुंबईकरांमध्ये पुन्हा एकवार उत्साह निर्माण झाला असून लवकरात लवकर एफएसआयचा निर्णय घ्यावा अशी मागणी नवी मुंबईकरांकडून करण्यात येवू लागली आहे.