नवी मुंबई : महापालिका मुख्यालय रेल्वे स्थानकापासून दूर असल्याने तसेच परिवहनच्या उपलब्ध बसेसच्या वेळातील फरक लक्षात घेता मनपा मुख्यालय ते वाशी रेल्वे स्थानक यादरम्यान स्वतंत्र बससेवा किमान कार्यालयात ये-जा करण्याच्या वेळेत उपलब्ध करून देण्याची मागणी मनपा कर्मचार्यांकडून केली जात आहे.
पामबीच मार्गावर बेलापुर किल्ले गावठाण चौकासमीप नवी मुंबई महापालिकेचे मुख्यालय आहे. हे मुख्यालय बेलापुर व सिवूड्स रेल्वे स्थानकाच्या मध्यभागी आहे. पालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर नियोजित एक रेल्वे स्थानक आहे. तथापि उरण रेल्वे सेवा कार्यान्वित झाल्यावरच या रेल्वे स्थानकाचा महापालिका कर्मचार्यांना फायदा होईल. महापालिका मुख्यालयाकडे येण्यासाठी महापालिका कर्मचार्यांना बेलापुर अथवा सिवूड्स रेल्वे स्थानकावरून परिवहनच्या बसेसने यावे लागते. सायन-पनवेल मार्गावरील उरण फाटा चौक भीमाशंकर सोसायटीजवळून एसटी बसेस अथवा एनएमएमटीच्या बसेसने यावे लागते. सिवूड्स व बेलापुर रेल्वे स्थानकावरून बससेवा उपलब्ध असल्या तरी दोन बसेसच्या मध्ये वेळेची तफावत आहे. त्यामुळे मुख्यालयात येताना बसेसची वाट पाहण्यापेक्षा अधिकांश कर्मचारी शेअरींग रिक्षा करून येत आहेत.
वाशी रेल्वे स्थानक ते मनपा मुख्यालय यादरम्यान कार्यालयात ये-जा करण्याच्या वेळेपुरती परिवहन उपक्रमाची स्वतंत्र बससेवा उपलब्ध करून देण्याची लेखी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका सुनिता रतन मांडवे यांनी मनपा आयुक्तांकडे केली असून त्यांच्याकडून या मागणीचा पाठपुरावा सुरूआहे.
वाशी रेल्वे स्थानक मध्यवर्ती असल्याने दिघा ते वाशीदरम्यान निवासी वास्तव्य असणार्या तसेच मुंबई, ठाणे, कल्याणवरून येणार्या कर्मचार्यांना या ठिकाणाहून मनपाने कार्यालयीन वेळेकरता स्वतंत्र बससेवा उपलब्ध करून दिल्यास कामगारांना मुख्यालयात ये-जा करण्यास दगदग सहन करावी लागणार नसल्याने लवकरात लवकर किमान मनपा कर्मचार्यांपुरती बससेवा उपलब्ध करून देण्याची मागणी नगरसेविका मांडवे यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.