* चांगल्या विचारांना सोबत घेऊन वाटचाल करण्याचे लोकनेते गणेश नाईक यांचे आवाहन
नवी मुंबई :कामगारांचे अश्रू पुसण्याची आणि त्यांचे हित साधण्याची ताकद श्रमिक सेना युनियनमध्ये असून भविष्यकाळ आपला आहे, असे सांगून चांगल्या विचारांना सोबत घेऊन वाटचाल करा, असे आवाहन श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते गणेश नाईक यांनी केले आहे.
राष्ट्रवादातून श्रमिकांचे सौख्य साधणारी युनियन म्हणून ओळखल्या जाणार्या श्रमिक सेनेचे विशेष मार्गदर्शनपर शिबीर गुुरुवारी दुपारी कोपरखैरणे येथे पार पडले. त्याप्रसंगी लोकनेते नाईक यांचे प्रेरणादायी विचार मोठ्या संख्येने उपस्थित श्रमिक सेनेचे पदाधिकारी आणि कामगारांनी ऐकले.
श्रमिक सेनेचे अध्यक्ष संजीव नाईक, युनियनचे खजिनदार ज्ञानेश्वर नाईक, राज्यभरातून आलेले विभागीय चिटणीस, युनिटप्रमुख आणि कामगार मोठ्या संख्येने या शिबिरासाठी उपस्थित होते. शिबिराच्या प्रारंभी श्रमिक सेनेचे सरचिटणीस दिवंगत अशोक पोहेकर यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. पोहेकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या सरचिटणीस पदावर युनियनचे चिटणीस चरण जाधव यांच्या नियुक्तीची घोषणा यावेळी करण्यात आली.
पोहेकर यांच्या निधनामुळे युनियनची हानी झाल्याचे लोकनेते गणेश नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सुरुवातीलाच सांगितले. कामगार संघटनांच्या आत्तापर्यंतच्या कार्याचा आढावा घेताना जहाल कामगार नेतृत्वामुळे असंख्य कामगार देशोधडीला लागल्याचे त्यांनी नमूद केले. कामगार आणि कारखान्यांचे मालक एकमेकांचे सहकारी असून दोन्ही घटक जगले पाहिजेत, अशी आपली भूमिका सुरुवातीपासून असल्याचे लोकनेते नाईक म्हणाले. युनियनच्या पदाधिकार्यांनी कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी कामगारांचे समाधान होईपर्यंत काम केले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला. कामगार पदाधिकार्यांमध्ये विनम्रता, सजगता आणि कामगारांना सदैव मदत करण्याची धारणा असायला हवी, अशी सूचना केली. दिशाहीन कामगारांना युनियनकडे वळवा आणि त्यांचे हित साधा, जो चांगल्या विचारांना सोबत घेऊन वाटचाल करेल त्याच्या पाठीशी मी राहीन, अशी ग्वाही देखील त्यांनंी दिली. युनियनचे पदाधिकारी, विभागीय चिटणीस यांच्या बैठका यापुढे ठराविक कालावधीमध्ये नियमितपणे होणार असून कामगारांचा एक भव्य वार्षिक मेळावा आयोजित केला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. श्रमिक सेना युनियनने केवळ कामगारांचे हित जोपासल्यामुळेच ही संघटना आत्तापर्यंत बदनाम झाली नाही, असेही लोकनेते नाईक यांनी विशेषत्वाने नमूद केले.
श्रमिक सेना युनियनचे अध्यक्ष संजीव नाईक यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणामध्ये सांगितले की, लोकनेते नाईक यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांनी केेलेल्या सूचनेनुसार श्रमिक सेनेची यापुढची वाटचाल राहील. श्रमिक सेनेची ताकद कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही वापरू. असंख्य कामगार वर्ग श्रमिक सेनेकडे आजही प्रचंड आशेने बघतो आहे, असे ते म्हणाले.
युनियनचे पदाधिकारी दिलीप पाटील आपल्या मनोगतात म्हणाले की, साहेबांच्या नेतृत्वाच्या परीस स्पर्शाने अनेकांचे जीवन उजळले आहे. साहेबांच्या कामगार हिताच्या विचारांची युनियनच्या प्रत्येक पदाधिकार्याने आणि प्रतिनिधीने कृतीशील अंमलबजावणी केली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. आजच्या प्रशिक्षण मार्गदर्शन शिबिरात पनवेलचे विभागीय चिटणीस सुनील घरत, नागपूरचे अजित भाकरे, उरणचे प्रशांत पाटील, मुरबाडचे अनंत कथोरे, भोईसरचे संजय पाटील, पालघरचे उमेश राऊत, विरेंद्र पाटील, वसईचे बलीराम यादव, पाताळगंगा येथील आनंद देशमुख, खोपोली येथील देहू म्हामुनकर, अलिबाग-पेणचे डी. एम. म्हात्रे, नागोठणे येथील साधुराम मालुसरे, उरणचे हनुमंत पाटील, अंबरनाथचे प्रमोद पाटील, कल्याणचे दत्ता पाटील, वाडा येथील अमित वैती आणि नवी मुंबई परिवहन सेनेचे सतिश बोराटे आदी विभागीय चिटणीस उपस्थित होते. या शिबिरामध्ये श्रमिक सेनेच्या आजवरच्या प्रगतीशील वाटचालीचे माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले.