मुंबई : काल सायंकाळी चेंबूर येथील आरसीएफ कॉलनीतील कचर्याला आग लागली. सुरुवातीला छोटी असलेली ही आग नंतर वाढली. आरसीएफच्या अग्निशामक दलाला ही आग आटोक्यात आणण्यासाठी पाच तास झगडावे लागले.
या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, या कॉलनीत स्वच्छ भारत अभियान अंतर्गत रहिवासी सुट्टीच्या दिवशी सफाई करतात. तेथील कचरा जमा करून जवळच असलेल्या एका मोठ्या खड्यात टाकतात. हा खड्डा अंदाजे 10 फूट खोल आहे. अलिकडे त्यावर 20 फूट उंच हा पलापाचोळा असलेला कचरा जमा झाला होता.
मंगळवारी अज्ञात व्यक्तिने या कचर्याला आग लावली. या आगीत आसपासच्या झाडांचेही नुकसान झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. ही आग आटोक्यात आणण्यासाठी पाच तास प्रयत्न करावे लागले. रात्री 11 च्या सुमारास ही आग आटोक्यात आली.
हा परिसर अतिसंवेदनशील आहे, 24 तास येथे सुरक्षा रक्षक असतानाही असा प्रकार घडल्याने या सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे.