अहमदनगर : राज्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदे यांच्या जामखेड मतदार संघात नव्याने नियुक्त केलेला भाजपा तालुकाध्यक्ष रवी सुरवसे मटका किंग आणि अवैध दारू व्यापारी असल्याचे उघड झाले आहे.
त्यामुळे जामखेड तालुक्यातील तालुकाध्यक्षच्या निवडीवरून पुन्हा एकदा राज्याचे गृहराज्य मंत्री राम शिंदे वादाच्या भोवर्यात सापडले आहे. राम शिंदे यांनी दोन दिवसांपूर्वी जामखेड तालुक्याच्या अध्यक्षपदी रवी सुरवसे याची निवड केली. मात्र, रवी सुरवसे याच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात जुगारीचे 3 गुन्हे दाखल आहेत.
गृहमंत्री राम शिंदे यांनीच सुरवसे याची निवड केली आहे. रवी सुरवसे याच्यावर मटका, जुगारीचे गुन्हे दाखल आहेत. यामुळे गृहमंत्रीच अवैध धंद्यांना संरक्षण देत असल्याचा माजी महसूल मंत्री सुरेश धस यांनी आरोप केलाय.
तसेच रवी सुरवसे याचे जामखेड तालुक्यातील खर्डा या गावात विनापरवाना दारू विक्री आणि मटक्याचे मोठे धंदे असल्याचे समोर आले आहे. खर्डा गावात ठिकठिकाणी मटका आणि हातभट्टीचे व्यवसाय असून अशा व्यक्तीची भाजपाच्या तालुकाध्यक्ष पदी निवड करून गृहराज्य मंत्री राम शिंदे हे नवीन पिढीला मटका आणि जुगाराकडे वळवत असल्याचा गंभीर आरोप माजी महसूल मंत्री सुरेश धस यांनी केलाय.
एवढेच नाही तर पोलीस प्रशासन देखील राम शिंदे यांच्या दबावामुळे रवी सुरवसे याला पाठबळ देत आहे, असाही आरोप धस यांनी केलाय. दरम्यान या संदर्भात जामखेड पोलीस स्टेशनमध्ये विचारणा केली असता पोलीस अधिकार्यांनी गुन्हे दाखल आहेत. मात्र, त्याबाबत कुठलीही माहिती देणार नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलीस प्रशासन गृहराज्य मंत्री राम शिंदे यांच्या दबावाखाली राहून सुरवसे याला पाठबळ देत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.