नवी मुंबई : मासेमारीचा व्यवसाय नवी मुंबईत अखेरच्या घटका मोजत असतानाच सारसोळेच्या खाडीत ढाप्यानजीक दोन मगरीचे गेल्या चार दिवसापासून दर्शन होवू लागल्याने मच्छिमार समाज भयभीत झाला आहे. गेल्या अनेक पिढ्या खाडीत व्यवसाय करत असताना कधीही या भागात मगर आली नाही, कोणीतरी जाणिवपूर्वक त्रास देण्यासाठी या मगरी येथे सोडल्या असल्याचा आरोप मच्छिमार समाजाकडून करण्यात येत आहे.
खाडीतील प्रदूषित पाणी, खाडीनजिकच्या परिसरात वाढती रहदारी यामुळे नवी मुंबईच्या खाडीत मासेमारीच्या प्रमाणात घट येत चालली आहे. खाडीपुलामुळे वाशी ते घणसोलीपर्यत खाडीमध्ये मासेच न राहील्याने तेथील मच्छिमारांना आता सारसोळे व दिवाळेच्या खाडीत मासेमारीसाठी जावे लागत आहे. खाडीपुलावरील वाहनांच्या रहदारीने पाण्यात हादरे बसत असल्याने मासे मृत असल्याचे व मासे या ठिकाणी फिरकत नसल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे.
सारसोळेच्या खाडीत ज्या ठिकाणी भरती-ओहोटीच्या काळात पाणी अडविण्यासाठी व सोडण्यासाठी नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून ढापे बसविण्यात आले आहेत. त्या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून एका मोठ्या मगरीचे व एका लहान मगरीचे मच्छिमारांना दर्शन होवू लागले आहे. सारसोळेचे व वाशीचे मच्छिमार या ठिकाणी पिढ्या न पिढ्या या ठिकाणी मासेमारीचा व्यवसाय करत असताना यापूर्वी कोणाला कधीही मगरीचे दर्शन झालेले नाही. भरतीमुळे मगर वाहत येणे अशक्य असल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे. ढाप्याच्या परिसरात या दोन मगरी मच्छिमारांना दिसू लागल्या असल्या तरी मगर दर्शनामागे षडयंत्र असल्याचा आरोप मच्छिमारांकडून करण्यात येत आहे. ढाप्याच्या परिसरात खाडीच्या बाजूने मगर असत्या तर एकवेळ पाण्यामुळे मगर या ठिकाणी आल्या असाव्यात,असा समज झाला असता. तथापि नाल्यातील व गटारातील पाणी ज्या ठिकाणाहून खाडीत येते, त्या ठिकाणी या दोन मगरीचे दर्शन झाल्याने या मगरी कोणीतरी येथे सोडल्या असाव्यात, असे मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे. खाडीत बामनदेव मार्गापासून हाकेच्या अंतरावरच हे ढापे आहेत. या ठिकाणी मासे पकडण्यासाठी व पकडलेले मासे सुकवण्यासाठी वाशी व सारसोळेचे मच्छिमार दिवसाउजेडी अथवा रात्री-अपरात्रीही जात असतात. या ठिकाणी मगर पाहिल्याचे फोटोही सारसोळेच्या युवकांकडून गेल्या दोन दिवसात व्हॉटस् अपवर टाकण्यात येवू लागले आहेत. मगरींना पाहण्यासाठी अन्य ठिकाणचे मच्छिमारही आता या ढाप्याच्या ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. या ठिकाणी कोणी मासेमारी करण्यास येवू नये तसेच कोणी फिरकू नये म्हणून मुद्दाम या मगर आणून सोडल्याचे मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे. वनखात्याने त्वरीत या दोन्ही मगरींचा बंदोबस्त करावा अन्यथा या ठिकाणी मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांवर उपाशी मरण्याची वेळ येईल असे स्थानिक मच्छिमारांकडून सांगण्यात येत आहे.