: मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण हल्ल्याच्या कटात सहभागी असलेला डेव्हिड हेडलीची साक्ष तांत्रिक बिघाडांमुळे उद्यापर्यंत स्थगित करण्यात आली आहे. या प्रकरणी हेडलीला माफीचा साक्षीदार बनवण्यात आले असून सोमवारपासून विशेष न्यायालयासमोर त्याच्या साक्षीला सुरूवात झाली.
नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्याची साक्ष सुरू होणार होती, मात्र तांत्रिक बिघाडामुळे त्याची साक्ष सुरू होण्यास विलंब झाला. आणि अखेर १० च्या सुमारास त्याची साक्ष उद्यापर्यंत स्थगित करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता उद्या, गुरूवार, सकाळी ७ वाजता त्याची पुन्हा साक्ष घेण्यात येईल ज्यामध्ये अनेक नवीन खुलासे होण्याची शक्यता आहे.
दरम्यान कालच्या सुनावणीदरम्यान त्याने प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिरही दहशतवाद्यांचे टार्गेट असल्याची कबुली दिली होती. त्यासाठी हल्ल्याच्या वर्षभरापूर्वी आपण मंदिराची बारकाव्याने रेकी केली होती, असे त्याने सांगितले होते. तसेच या हल्ल्यामागे पाकची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचाही हात होता. भारतामध्ये अतिरेकी कारवाया करणाऱ्या लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन यांसारख्या दहशतवादी संघटनांना आयएसआय आर्थिक, नैतिक आणि लष्करी मदत करते. या तिन्ही संघटना आयएसआयच्या छत्रछायेखाली भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणतात, अशी साक्ष देऊन हेडलीने पाकच्या ‘नापाक’ इराद्यांचा आतंकी चेहरा जगासमोर आणला.